गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं विजय मिळवल्यानंतर राज्यात देखील आत्तापासूनच निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे २०२४मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे राज्यात नवी सत्तासमीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएमनं महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राजकीय वर्तुळात यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी टोला लगावला आहे.

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

“खरंच करून दाखवलं…!”

नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “वाह..एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच करून दाखवलं”, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांनी फेटाळली युतीची शक्यता

एकीकडे एमआयएमनं युतीसाठी महाविकास आघाडीसमोर हात पुढे केला असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. “महाराष्ट्रात तीन पक्षांचच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारानं चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत”, असं राऊत म्हणाले आहेत.