अहिल्यानगर: एक सर्वसामान्य दूध व्यवसायिक ते सहावेळा आमदार व जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी अशी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची वाटचाल राहिली आहे. सतत लोकांमध्ये राहणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबातील बहुतांशी सदस्य, जवळचे नातलग हे जिल्ह्यात मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व असलेले आहेत. त्यांचे जावई संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत, दुसरे जावई संदीप कोतकर माजी महापौर आहेत, त्यांच्या चार मुलींपैकी तीन मुली सुवर्णा संदीप कोतकर, शितल संग्राम जगताप व ज्योती अमोल गाडे या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांची व्याही स्व. अरुण जगताप हे माजी आमदार होते.

शिवाजी कर्डिले यांचे गाव बुऱ्हाणनगर नगर शहराजवळच आहे. दूध व्यवसायिक असतानाच नागरिकांच्या समस्यांमध्ये ते लक्ष घालू लागले. लोकही आपल्या समस्या त्यांच्याकडे नेत असत. त्यातूनच ते प्रथम बुऱ्हाणनगरचे सरपंच झाले. तरुणपणाच्या काळात शिवाजी कर्डिले यांनी गावोगावचे कुस्त्यांचे फडही गाजवले होते. नगर तालुक्यातील प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध त्यांनी आव्हान उभे केले. त्यातूनच ते प्रथम नगर-निवासे मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेत विजयी झाले. दुसऱ्या वेळीही ते अपक्ष म्हणूनच विजय झाले व युती सरकारच्या काळात शिवसेना पुरस्कृत म्हणून त्यांनी मत्स्य व बंदर विकास खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळले. मंत्री असताना त्यांनी मच्छिमार व्यावसायिकांना डिझेलमध्ये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

याच काळात नगरचे ते अल्पकाळ पालकमंत्री होते. त्यावेळी दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांची छावणी मंत्री म्हणूनही ओळख झाली होती. शिवाजी कर्डिले यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही ते विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते दोनवेळा विजय झाले. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यामध्ये यश आले नव्हते.

त्यानंतर कर्डिले यांनी नगर-राहुरी -पाथर्डी या मतदारसंघातूनही दोनवेळा भाजपकडून विजय मिळवला. गेल्या सन २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला. या पराभवाची परतफेड शिवाजी कर्डिले यांनी सन २०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून केली. याच निवडणुकीच्या काळात त्यांना आजारपणाने ग्रासले.

जिल्हा बँकेच्या राजकारणात ते विखे विरोधी बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमधून विजय झाले होते मात्र अलिकडे राज्यामध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा बँकेत उलथापालथ झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे यांच्या पाठिंब्याने ते जिल्हा बँकेचे तीन वर्षांपूर्वी अध्यक्षही झाले. त्याचवेळी बँकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपद भाजपकडे आले.

मुरब्बी राजकारणी अशी ओळख असली तरी त्यांची वाटचाल काही प्रमाणात वादग्रस्त ठरली. एका खुनाच्या गुन्ह्यात त्यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. हा खटला सध्या प्रलंबित आहे. शिवाजी कर्डिले गेल्या सुमारे वर्षभरापासून आजारीच होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यावर मात करून ते काही महिन्यांपूर्वी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय झाले होते. सतत लोकांमध्ये मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख होती.