नवी दिल्ली : दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शनिवारी संसदरत्न पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांचाही समावेश होता. पण, शनिवारी सदनातील या कार्यक्रमाला दुबेंनी दांडी मारली. मराठीच्या मुद्द्यावरून दुबेंना लोकसभेच्या लॉबीत जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सन्मानपूर्वक हा पुरस्कार स्वीकारला.
संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या १७ खासदारांमध्ये मराठीतर खासदारांमध्ये भर्तृहरी मेहताब, रवी किशन, निशिकांत दुबे, एन. के. प्रेमचंद्रन, प्रवीण पटेल, विद्याुत बरन मेहतो, दिलीप सैकिया, चरणजीतसिंह चन्नी आदींचा समावेश होता. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. या समारंभाला निशिकांत दुबे गैरहजर राहिले.
मराठी-हिंदी वादामध्ये दुबे यांनी मराठी राजकीय नेत्यांना आव्हान दिले होते. दुबेंच्या या आव्हानाला लोकसभेतील काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले होते.
लोकसभेतील लॉबीमध्ये झालेल्या कोंडीनंतर महाराष्ट्र सदनात जाऊन पुन्हा अडचणीत सापडण्याची भीती वाटल्यानेच दुबेंनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणे टाळले असल्याची चर्चा महाराष्ट्र सदनामध्ये रंगली होती. लोकसभेच्या लॉबीत दुबेंना जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला होता.
संसदरत्न पुरस्कारांचे वितरण
वर्षा गायकवाड शनिवारी सदनातील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. त्यांनी रिजिजू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
गायकवाड यांच्यासह सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, श्रीरंग बारणे हे मराठी खासदारही या पुरस्काराचे मानकरी ठरले.