Nishikant Dubey : मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. संबंधित व्यापारी मराठीत बोलला नाही, म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सात कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणानंतर भाजपा आणि मनसेच्या नेत्यांमध्ये जोरादार आरोप-प्रत्यारोप करत वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. यातच ठाकरे बंधूंनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना देखील राज ठाकरे यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं.
तसेच मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर सहन केलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला होता. दरम्यान, मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतीयांना मनसेकडून मारहाणीच्या घटनेनंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसेच दुबे यांनी परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना एक प्रकारे आव्हान देत डिवचलं आहे. निशिकांत दुबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये कुत्रा असा शब्द संबोधल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
निशिकांत दुबे यांनी काय म्हटलं?
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी एक्स (ट्विटर) या सोशल माध्यमावर पोस्ट केली आहे. तसेच या पोस्टमध्ये निशिकांत दुबे यांनी ही पोस्ट राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाला टॅग केलं आहे.
"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 6, 2025
“तुम्ही आमच्या पैशांवर जगताय…”, निशिकांत दुबे
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केल्यानंतर एएनआयशी बोलताना पुन्हा ठाकरे बंधूंवर जहरी टीका केली आहे. निशिकांत दुबे म्हणाले की, “तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणतंही युनिट नाही. टाटांनी तर पहिली फॅक्टरी बिहारमध्ये बनवली. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता टॅक्स भरता? तुमच्या जवळ कोणती इंडस्ट्री आहे?”, असा सवाल खासदार निशिकांत दुबे यांनी केला.
#WATCH | Guwahati, Assam | On Raj Thackeray's remark 'beat but don't make a video', BJP MP Nishikant Dubey says, "…You people are surviving on our money. What kind of industries do you have?… If you are courageous enough and beat those who speak Hindi, then you should beat… pic.twitter.com/gRvAjtD0iW
— ANI (@ANI) July 7, 2025
“जर तुमच्यात जास्त हिंमत असेल तर उर्दू भाषकिांना मारहाण करून दाखवा. उर्दू, तमिळ आणि तेलुगू बोलणाऱ्यांनाही मारहाण करून दाखवा. जर तुम्ही इतके मोठे ‘बॉस’ असाल तर महाराष्ट्रातून बाहेर पडा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या. मग पटक पटक के मारेंगे.’ आम्ही देखील मराठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांचा आदर करतो. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे करत आहेत, ते अयोग्य आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहिमला जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिक लोकांना मारहाण करून दाखवी”, असं खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेला दिला होता इशारा
मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सूचक इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, “भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांना पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
“भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.