दुर्गराज रायगडावरील ‘मदार मोर्चा’ येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुरातत्व विभागास लिहिले आहे. या पत्रामधून त्यांनी रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेतलाय. या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी संभाजीराजेंनी केलीय.

“किल्ले रायगड येथील ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून यासंदर्भात निदर्शनास आणून दिले,” असं संभाजीराजे म्हणालेत.

“ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे,” असं म्हणत संभाजीराजेंनी आक्षेप नोंदवला आहे.

“किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी ‘मदार मोर्चा’ या ठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा,” अशी मागणी या पत्रामधून संभाजीराजेंनी केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई विभागाचे अधीक्षक तसेच नवी दिल्लीमधील भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना संभाजीराजेंनी हे पत्र पाठवलंय. या पत्रानंतर तातडीने या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचं संभाजीराजेंनी अन्य एका पोस्टमधून काही तासांनी फोटो शेअर स्पष्ट केलं.