भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी (१२ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाले याबाबत मला काही माहिती नाही. बंड झाले आहे का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”

“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे”

“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.

हेही वाचा : संजय राऊतांबाबत प्रश्न विचारताच उदयनराजेंनी जोडले हात, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची”

“इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजेंनी नमूद केलं.