नांदेड : भाजपा (नांदेड उत्तर)च्या जिल्हाध्यक्षांनी आपली नवीन कार्यकारिणी खा.अशोक चव्हाण यांच्या चरणी अर्पण करताना २६ जणांच्या चमूमध्ये एकट्या भोकर मतदारसंघातील १६ जणांना स्थान दिले आहे. जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख याच मतदारसंघातील असून ४ पैकी ३ सरचिटणीस त्यांनी याच मतदारसंघातून निवडले आहेत. हदगाव-हिमायतनगर तालुक्यांना चिटणीसपदात गुंडाळण्यात आल्याचे दिसते.
नांदेड (दक्षिण जिल्हा) आणि महानगर भाजपाची कार्यकारिणी तीन दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्यांतही काँग्रेस व अन्य पक्षांतून भाजपात आलेल्या चव्हाण समर्थकांचा भरणा होताच. नांदेड (उत्तर) संघटनात्मक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात किनवट, हदगाव आणि भोकर विधानसभा क्षेत्रांतील ७ तालुक्यांचा समावेश आहे; पण जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख यांनी या भागातल्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून चव्हाण समर्थकांना प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे.
वरील कार्यकारिणीची घोषणा बुधवारी सायंकाळी करण्यात आली. या कार्यकारिणीतून माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर आणि ज्येष्ठ नेते राम चौधरी यांच्या समर्थकांना हद्दपार करण्यात आले आहे. किनवट येथील प्रा.किशन मिरासे यांना पहिल्या क्रमांकाचे सरचिटणीस करून जिल्हाध्यक्षांनी उर्वरित तीन सरचिटणीस भोकर मतदारसंघातून निवडले. त्यांत मंगाराणी अंबुलगेकर (भोकर), रामचंद्र मुसळे (भोकर) आणि भोकर रस्त्यावरच्या बारड येथील बाळू देशमुख बारडकर यांचा समावेश आहे.
देशमुख यांच्या नव्या चमूमध्ये १० उपाध्यक्ष असून त्यांतही चव्हाण समर्थकांचा भरणा आहे. भोकर विधानसभा क्षेत्रातून अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यास स्थान देण्यात आले नाही. दिव्यांग असूनही पक्षकार्यात सक्रिय योगदान देणार्या प्रवीण गायकवाड यांना डिच्चू देण्यात आला आहे.
नव्या उपाध्यक्षांमध्ये किशोर पाटील लघळूदकर, शंकर मुतकलवाड, बबलू नाईक, कांतराव घोडेकर, बाबुराव केंद्रे, संदीप केंदेे्र, राजेंद्र केशवे, नागोराव भांगे पाटील, व्यंकटराव नेम्मानीवार यांचा समावेश आहे. तर ९ चिटणीसांमध्ये गणेश पाटील कापसे, तातेराव पाटील वाकोडे, संतोष गाढे, कल्पना भोसले, वर्षाताई बंडाळे, सुप्रिया मुनेश्वर, गोविंद विसमिल्ले, आशिष सकवान व तोलाजी खानसोळे यांना स्थान मिळाले. मुदखेडचे दिगंबर टिप्परसे यांना कोषाध्यक्ष तर अर्धापूरच्या सचिन कल्याणकरांवर प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करताना भौगोलिक तसेच सामाजिक समतोल राखला गेला नाही. भोकर आणि किनवट या मतदारसंघांमध्ये पक्षाचे आमदार असल्यामुळे या मतदारसंघांना जादा प्रतिनिधित्व देण्यात आले. हदगाव-हिमायतनगर भागावर मात्र अन्याय करण्यात आला आहे. मुखेड मतदारसंंघाच्या असलेल्या मंगाराणी अंबुलगेकर यांना उत्तरच्या कार्यकारिणीत घुसविण्यात आल्याचे दिसते. – प्रवीण गायकवाड, माजी सरचिटणीस, भाजपा</strong>.