महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेला भारतीय जनता पार्टीकडून महायुतीत येण्याची ऑफर आहे, वक्तव्य केल्याच्या बातम्या नुकत्याच काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत. या वृत्तावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले, राज ठाकरे आमच्याबरोबर असावेत अशीच आमची इच्छा आहे. मुंबईच्या हिताचा विषय येईल तेव्हा ते आमच्याबरोबर असतील.

दीपक केसरकर म्हणाले, जेव्हा नवे बदल होत असतात तेव्हा काही अडथळे निर्माण होतात. परंतु, हे अडथळे कायमस्वरुपी आहेत असं मला वाटत नाही. राज ठाकरे यांचं मुंबईवर खूप प्रेम आहे. मुंबईचं हित होतंय हे दिसेल तेव्हा राज ठाकरे आमच्याबरोबर असतील असंच मला वाटतंय. अर्थात ते आमच्याबरोबर असावेत असं मला वाटतं. परंतु, हा निर्णय अर्थातच वरिष्ठांनी घ्यायचा आहे. हा निर्णय भाजपा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यायचा आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज ठाकरे हा एक धडाडीचा नेता आहे. त्यांचं भाषण ऐकायला लाखो लोक जमतात. ही त्यांची ताकद आहे. त्यांच्या याच ताकदीचा वापर महाराष्ट्राच्या तसेच मुंबईच्या हितासाठी व्हायला हवा असं मला वाटतं.

राज ठाकरे काय म्हणाले?

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी काही पत्रकारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची नेमकी काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात. आता तर तुम्हाला सगळ्यांनाच याची सवय झाली आहे. पण महाराष्ट्राची प्रतारणा आमच्याकडून होणार नाही, याची जास्तीत जास्त काळजी आम्ही घेऊ.

हे ही वाचा >> “हुकूमशाही सरकारविरोधात रस्त्यावर उतरा”, सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांना भाजपाची ऑफर?

मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बैठक आज (१४ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीला पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राज ठाकरे यांनी आपल्याला भाजपाची ऑफर आहे. परंतु, मी अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाही, असं वक्तव्य केलं असल्याचं असं वृत्त टीव्ही ९ मराठीने प्रसिद्ध केलं आहे. यावरच दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.