बंगाल्या उपसागरात उठलेल्या गुलाब चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाले आहेत. मराठवाड्यासही इतरही अनेक भागांमध्ये तुफान पाऊस झाल्याचं दिसून आलं असून लाखो एकर जमीन पावसानं झोडपून काढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला असला, तरी त्यावर विरोधी पक्षांचं समाधान झालेलं नाही. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपानं या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात राज्य सरकारवर निशाणा साधतानाच “घोषणा खूप झाल्या, आता थेट मदत करा”, अशी भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ, यावेळी राज्य सरकारकडून मोठमोठ्या पॅकेजच्या घोषणा करण्यात आल्या. पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपत्तीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता घोषणा खूप झाल्या, आता थेट मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा व्हावी, ही मदत काही महिन्यानंतर नाही तर आता तातडीने करा”, अशी मागणी त्यांनी केली. पुण्यात ते बोलत होते.

सरकार संवेदनाहीन…

दरम्यान, यावेळी प्रविण दरेकरांनी सरकारवर संवेदनाहीन असल्याची टीका केली. “सरकार संवेदनाहीन दिसत आहे. महाविकास आघाडीची एक ठरलेली भूमिका आहे. ती म्हणजे काही झाले तर केंद्रावर ढकलायचे आणि मोकळे व्हायचे. तौक्ते चक्रीवादळ असो, निसर्ग चक्रीवादळ असो किंवा पुराने झालेले नुकसान असो; आत्तापर्यंत केंद्राने शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींची मदत केली आहे. आम्हीही केंद्राकडे मदतीची मागणी करू. पण केंद्राकडे बोट दाखवून आपल्या जबाबदारीपासून राज्य सरकारला दूर पळता येणार नाही”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

फडणवीस-दरेकर मराठवाड्याच्या दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीसांसोबत आपण दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याचं दरेकरांनी यावेळी सांगितलं. “विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मी दोन दिवसाच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर जाणार आहोत. तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मंत्री धनंजय मुंडे यांनीही पंचनामे करू नका पण मदत करा अशी मागणी केली आहे, तर वडेट्टीवार यांनीही पंचनामे न करता मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फक्त बोलून दिलासा किंवा धीर मिळणार नाही. तर यासंदर्भात त्यांनी त्वरित आदेश काढले पाहिजेत”, असं ते म्हणाले. राज्य सरकारने एकच स्पष्ट भूमिका घेऊन मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दरेकर यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pravin darekar targets maharashtra government on marathwada heavy rainfall issue pmw
First published on: 30-09-2021 at 18:05 IST