मोहनीराज लहाडे लोकसत्ता 

नगर: २०२४ सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपने राज्य कोअर समितीमधील नेत्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवताना नगर जिल्ह्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली. गेल्या काही वर्षांत भाजपला अनुकूल बनू पाहणारा जिल्हा अलीकडे भाजपच्या हातून निसटला, जिल्हा संघटनेत निर्माण झालेली बेदिली, दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर निर्माण झालेला नव्याजुन्यांचा वाद, एकसंधपणाचा अभाव अशी सारी परिस्थिती नेतृत्वाला लागणार आहे. इतर कोणत्याही मोठय़ा जिल्ह्यांपेक्षा फडणवीस यांनी नगरचे प्रभारीपद स्वीकारले यातून भाजपने नगरला दिलेले महत्त्व अधोरेखित होते. 

पूर्वी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेला नगर जिल्हा सहकार व साखर कारखानदारीच्या माध्यमातून काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली आला. या वर्चस्वाला भाजप-शिवसेना युतीने तडा दिला. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूक दरम्यान माजी मंत्री राधाकृष्ण विखे, मधुकर पिचड यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपला अधिक यश मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. उलट भाजपचे जिल्ह्यातील विधानसभेचे संख्याबळ घटले. 

या पराभवानंतर लगेचच भाजपचे नेते एकवटले आणि त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात एकत्रित फडणवीसांकडे तक्रारी केल्या. माजी मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे आदींनी विखे यांनी विरोधात काम केल्याच्या तक्रारी केल्या. तेव्हापासून विखे विरुद्ध भाजपतील इतर नेते असे वातावरण कायम आहे. काँग्रेसमध्ये असतानाही विखेविरुद्ध इतर सर्व असेच चित्र असायचे. ते भाजपमध्ये असतानाही कायम राहिले.

गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या ठिकठिकाणच्या भाषणातून एक वेगळा विचार मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढण्याची गरज आहे, आपल्यावर अन्याय झाल्यास आपण केव्हाही पलटी मारू शकतो, असे ते सांगतात. त्यांची ही भाषणे भाजपच्या नेत्यांना अस्वस्थ करणारी आहेत. शिवाय त्यांची व राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांची जवळीक वाढून त्यांनी एकमेकांच्या गळय़ात गळे घालून कार्यक्रम सुरू केले आहेत. दोघेही एकमेकांचे कौतुक करतात. त्यामुळेही भाजपमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या कार्यक्रमात पक्षाचे निष्ठावान अपवादानेही सहभागी नसतात. आ. जगताप यांचे सासरे व भाजप नेते, माजी मंत्री कर्डिले आणखी किती काळ पक्षात राहतील याबद्दल जिल्ह्यातील नेत्यांना भरोसा वाटेनासा झाला आहे. कर्डिले यांचा नगर शहरातील हस्तक्षेप पक्षाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाहीह्ण अशी अवस्था झाली.

भाजप सरकारच्या काळात राम शिंदे यांच्याकडे तब्बल साडेचार वर्ष पालकमंत्रीपद होते. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचेच कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमधून पळ काढत आहेत. परिणामी कर्जतची पालिकाही शिंदे यांना गमवावी लागली. शिवसेनेचे नेते जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनीही नेवाशातील भाजपा पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्रीपद, महत्त्वाची खाती, फडणवीसांशी असलेली जवळीक अशी अनुकूलता लाभूनही राम शिंदे यांना जिल्ह्यात आपले नेतृत्व, संघटना बांधणी प्रस्थापित करता आली नाही. सध्या भाजपला जिल्ह्यात एकमुखी नेतृत्व नाही.

नगर जिल्ह्यात वेगळय़ा प्रकारचे राजकारण चालते, त्यावरही फडणवीस निश्चितच अंकुश ठेवतील. त्यामुळे पक्षाशी निष्ठा असलेल्या, एकनिष्ठ असलेल्यांच्या राजकारणाला चालना मिळेल. अलीकडच्या काळात नगर जिल्ह्यात अनेक राजकीय नेत्यांची भाजपमध्ये आवक झाली आहे. नव्याजुन्यांचा समेट घडवण्यासाठीही फडणवीस यांची प्रभारीपदी झालेली नियुक्ती उपयुक्त होईल. फडणवीसांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्यात भाजप भरारी घेईल.

राम शिंदे, भाजप नेते