रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व वाढविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना शह  देत जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे श्री. संदीप सुर्वे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाचे कमी सदस्य या समितीत असताना बिनविरोध सभापती निवडण्याची किमया भाजपाच्या नेत्यांनी  उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बाल्लेकिल्ल्यात करुन दाखविली आहे. हा मंत्री उदय सामंत यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. या निवडीमुळे रत्नागिरीतील राजकारणाला वेगळी रंगत येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे सदस्य कमी असताना ही  संदीप सुर्वे यांच्या सभापती पदी वर्णी लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी  भाजपने  आपला उमेदवार निवडून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या निवडणूकीमध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी यात मोठी कामगिरी केली असल्याचे सांगितले जात आहे. या सभापती निवडणुकीसाठी संदीप सुर्वे यांच्याविरुद्ध एक जण उभा राहिला होता. परंतु त्यांनी तो अर्ज मागे घेतल्याने संदीप सुर्वे हे बिनविरोध निवडून  आल्याने भाजपमध्ये उत्साह पसरला आहे.

दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती चा कार्यकाळ दि. २७/०६/२०२३ते दि. २६/०६/२०२८असा असणार आहे.यामध्ये संचालक म्हणुन सभापती संदिप हनुमंत सुर्वे संचालक पदी श्री. सुरेश भिकाजी सावंत, श्रीम. स्नेहल सचिन बाईत, श्री. गजानन कमलाकर पाटील,  श्री. अरविंद गोविंद आंब्रे,  श्री मधुकर दिनकर दळवी, श्री. सुरेश मारुती कांबळे, श्री. हेमचंद्र यशवंत माने, श्रीम. स्मिता अनिल दळवी, श्री. विजय वासुदेव टाकले, श्री नैनेश एकनाथ नारकर, श्री. रोहित दिलीप मयेकर, श्री. ओंकार संजय कोलते, श्री. प्रशांत यशवंत शिंदे, श्री. पांडूरंग जयराम कदम तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी हे  पदसिद्ध असणार आहेत. या निवडणुकीच्या वेळी  माजी आमदार श्री. राजन साळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आबा घोसाळे, प्रकाश रसाळ, माजी नगरसेवक संजय साळवी, निलेश आखाडे, दादा ढेकणे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बाजार समितीचे सदस्य उपस्थित होते.