देशभरातील सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील जागांवर या दिवशी मतदान होईल. महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील त्यांच्या पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली असून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे यामध्ये आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांचे राज्यभर दौरे चालू आहेत. यादरम्यान, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या प्रचारकार्यात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर दिसत आहेत.

राज्यातील जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. यादरम्यान, नुकतीच त्यांची उमरखेड येथे सभा पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव हे ठाकरे यांच्याबरोबर राज्यभर फिरत आहेत. ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राऊत आणि दानवे यांचीदेखील भाषणं होतात. व्यासपीठावर हे नेते उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसलेले दिसतात. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू असताना हे नेते पेंगत असल्याचे, डोळे बंद करून बसल्याचे, जांभया देतानाचे आणि झोपल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. भाजपा आयटी सेलचे कर्मचारी हे व्हिडीओ व्हायरल करत आहेत.

भाजपा आयटी सेलच्या पल्लवी सीटी यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू असतानाच व्यासपीठावर पेंगणाऱ्या आणि जांभया देणाऱ्या संजय राऊत, अंबादास दानवे आणि आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स ठाकरे गटाला ट्रोल करत आहेत.

हे ही वाचा >> शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश, शिरूर लोकसभेचं तिकीट पक्कं?

उमरखेडच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“भाजपाला महाराष्ट्रात ‘उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस’ असं कठपुतलीच्या तालावर नाचणारं सरकार हवं होतं. परंतु, असा कठपुतलीचा खेळ माझ्याकडून होत नव्हता. त्यामुळे ’मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’चा नारा देत महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आले. दुसऱ्याच्या संपत्तीवर दरोडा टाकून स्वत:ची संपत्ती दाखवणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातल्या सरकारचा कठपतली सरकार असा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केला.