सोलापूर : मुंबईत एका महिला कार्यकर्तीच्या प्रेमजाळ्यात अडकल्याने वादाच्या भोव-यात सापडलेले भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पदावरून पायउतार होणे भाग पडले आहे. त्यांनी दिलेला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगेचच स्वीकारला आहे. या घडामोडींमुळे भाजपची नाचक्की झाली आहे.

श्रीकांत देशमुख हे तीन वर्षांपासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत होते. मुंबईत एका महिलेने श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात हनिट्रॅप लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला होता. मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात देशमुख यांनी दिलेल्या तक्रारी नुसार संबंधित महिलेविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपी महिला खोट्या गुन्ह्यात अडकावण्याची भीती दाखवत मुंबईत सदनिका आणि दोन कोटींची मागणी करीत होती. देशमुख यांनी तिला तीन लाख ७८ हजारांची रक्कम दिली होती.

या पार्श्वभूमीवर श्रीकांत देशमुख आणि संबंधित महिला एका शयनगृहात असतानाची चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारीत झाली आहे. यात संबंधित महिला देशमुख यांच्या विरोधात भाष्य करीत असताना बाजूलाच अंगावर बनियान परिधान केलेले श्रीकांत देशमुख हे तिच्या हातातील स्मार्टफोन बळजबरीने हिसकावून घेताना दिसतात. तर याशिवाय संबंधित महिला आणि देशमुख यांच्यात भ्रमणध्वनीवर झालेला १७ मिनिटांचा संवादही समाज माध्यमांवर फैलावला आहे. यात संबंधित महिला देशमुख यांना असा अन्याय का केला म्हणून जाब विचारत आहे तर देशमुख हे नरमाईच्या सुरात बचाव करताना दिसून येतात.

दरम्यान, संबंधित तरूण महिला ही भाजपची कार्यकर्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीकांत देशमुख हे पैलवान आहेत. ते नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. यापूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते सांगोला मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी निवडणूक प्रचारात आपल्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती. सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी या प्रकरणाची तेवढ्याच गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली असता देशमुख यांनीच स्वतःविषयी मतदारांमध्ये सहानुभूती मिळविण्यासाठी खोटेपणाने गोळीबाराचा डाव रचल्याचे उजेडात आले होते. त्यामुळे देशमुख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. अलिकडे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून थेट जिल्हाध्यक्षपद मिळविले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीकांत देशमुख हे मूळचे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते होते. दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी ताकद दिल्यानंतर ते २००४ साली प्रथमच जिल्हा परिषद सदस्य झाले होते. नंतर जनसुराज्य पक्ष आणि पुढे भाजप असा त्यांचा प्रवास झाला आहे. २०१४ साली सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांना भाजपने उभे केले होते.