“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता”, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. तसेच एका सभेत बलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे हे निष्क्रिय मुख्यमंत्री होते, असा घणाघात केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“उद्धव ठाकरे यांना पुत्र प्रेम आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना हे माहिती आहे की आता आयुष्यभर माझ्या घरातले कोणीही मंत्री होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंनी चोरुन मुख्यमंत्रिपद घेतले आणि शिवसैनिकांना सोडून स्वत:च्या मुलाला मंत्री केले. त्याऐवजी एका शिवसैनिकाला मोठे करता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले असेल तर मुलाला मंत्री केले”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना मनोरुग्णालयात…”, फडणवीसांवर एकेरीत टीका केल्यांतर बावनकुळे खवळले…
अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री
“उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ सर्वांना माहिती आहे, अडीच वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, अडीच वर्षात फक्त दोनदा विधिमंडळात जाणारे मुख्यमंत्री, अडीच वर्षात फक्त दोनवेळा मंत्रालयामध्ये आलेले मुख्यमंत्री, हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास पाहिला तर उद्धव ठाकरे पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे हे मनोरुग्णासारखे वागत आहेत. ते मानसिक स्थिती ढासाळल्या सारखे वागत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांची काळजी घ्यायला हवी”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
बावनकुळे पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या बोलण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे ते काहीतरी बोलतात. आदित्य ठाकरे यांना कोणी मुख्यमंत्री काय मंत्रीदेखील केले नसते. त्यांनी कधी कोणाचे रेशन कार्ड काढले नाही. एका मतदारसंघात एकदा निवडून आले”, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर साधला.