निश्चलनीकरणानंतर देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली असून शेतकरी हिताचे सर्वाधिक निर्णय भाजपा सरकारने घेतले आहेत. याचा निश्चित लाभ येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाला होईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
शिराळा येथे राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश झाला. यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, नोटा बदलीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यात भाजपाच प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाचे सामान्य माणसांनी स्वागतच केले असून यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी झाली आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना गाजर व मुळा यांच्यातील फरक समजत नाही अशांना शेतकरी वर्गाची दु:खे काय कळणार?
राज्यात फडणवीस सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले, यामध्ये टंचाईग्रस्त भागासाठीचे निकष ५० टक्क्यावरून ३३ टक्क्यावर आणले. शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान भरपाई एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. रासायनिक खतांच्या किमती ५ वष्रे स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी वाढत्या दरातील तफावत शासन सोसणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे गावे दुष्काळमुक्त करण्याला चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्राची सत्ता असताना काँग्रेसचे मनमोहन सिंग यांच्या चेहऱ्यावर हास्य कधी दिसलेच नाही, परदेशात त्यांची प्रतिमा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे नेते अशीच निर्माण झाली होती. मात्र मोदी यांनी देशाची ही प्रतिमा बदलली असून धाडसी निर्णयही देशाचे पंतप्रधान घेऊ शकतात हे जगाला दाखवून दिले आहे असेही दानवे यांनी सांगितले.
शिराळा तालुक्यातील सागाव येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संजयकाका पाटील, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी मान्यवरांसह अनेक भाजपा कार्यकत्रे उपस्थित होते.
शिवाजीराव नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वास कारखान्याचे संचालक उदयसिंह नाईक यांच्यासह काही प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.