सांगली : करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करत या प्रकरणी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्या भ्रमणध्वनीवरील संभाषणाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी आटपाडी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे सोमवारी केली.
निवेदनात म्हटले आहे की, करगणी येथे अल्पवयीन मुलीने टोळक्याच्या त्रासाने आत्महत्या केली. या प्रकरणातील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न राजकीय हस्तक्षेपातून झाला आहे. पीडित कुटुंबांनीही याबाबत थेट आरोप केले आहेत. पोलिसांवर या संवेदनशील प्रकरणात कोणाचा दबाव होता हे स्पष्ट होणे आवश्यक असून या प्रकरणी आमदार बाबर यांच्या दूरध्वनी संवादाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन आज तहसीलदार सागर ढवळे यांना देण्यात आले.पीडितेच्या आत्महत्येनंतर, गुन्हा नोंदवण्यास विलंब का झाला. कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव होता, याची स्वतंत्र चौकशी व्हावी असेही निवेदनात म्हटले असून भाजपचे तालुकाध्यक्ष हुबाले, जयवंत सरगर, विनायक पाटील, चंद्रकांत दौंडे, विष्णुपंत अर्जुन, उमाजी चव्हाण, विकास भुते, अजित जाधव, मोहन खर्जे, जीवन कासार, राहुल सपाटे आदींनी हे निवेदन दिले.