कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नवीन प्रभाग रचना पद्धतीवर पालिका निवडणूक कार्यालयात ९९७ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर शुक्रवारी शासनाच्या सचिवांसमोर सुनावण्या झाल्या. यावेळी प्रभाग रचनेत सुधारणा झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.
तसेच, २७ गावांचा विचार न करता मनमानी करून गावे नवीन प्रभाग रचनेमध्ये समाविष्ट करून गावांची गळचेपी केल्याचा आरोप संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नवीन प्रभाग रचनेत गावांचा फेरविचार केला नाहीतर आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना गेल्या महिन्यात जाहीर झाली. हे नवीन रचना शिवसेनेने आपल्या सोयीप्रमाणे करून घेतली आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. मागील १५ दिवसात नवीन प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची मुभा रहिवासी राजकीय नेत्यांना देण्यात आली होती. तर १५ दिवसात ९९७ हरकती पालिका निवडणूक विभागात दाखल झाल्या होत्या. डोंबिवली येथील सावरकर रोड प्रभागातून ३४५ हरकती दाखल झाल्या होत्या.
सुधारणा करण्यात आली नाहीतर या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान – आमदार गणपत गायकवाड
या हरकतींवर शुक्रवारी शासनाचे ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासमोर सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणीसाठी ३६ गट तयार करण्यात आले होते. यावेळी राजकीय नेते. पदाधिकारी अधिक संख्येने उपस्थित होते. सुनावणीनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, ” नवीन प्रभाग रचना योग्यरीतीने करण्यात आली नाही. सोयीसाठी उल्हासनगर मधील काही भाग कल्याण-डोंबिवली पालिकेत घेण्यात आला आहे. नवीन प्रभाग रचनेत सुधारणा करण्यात आली नाहीतर या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्यात येईल.”
गावांचा विचार न घेता २७ गावे नवीन प्रभाग रचनेमध्ये का समाविष्ट केली? –
२७ गाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुनावणी अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले. १८ गावे महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल आहे. उर्वरित ९ गावे पालिकेतून वगळावीत म्हणून समिती प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत गावांचा विचार न घेता शासन पालिकेने २७ गावे नवीन प्रभाग रचनेमध्ये का समाविष्ट केली? असा प्रश्न संघर्ष समितीचे गुलाब वझे आणि चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, २२ गावांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्यास आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी दिला. भाजपा, संघर्ष समितीने प्रभाग रचनेवरून आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या काळात शिवसेना विरुद्ध भाजपा, संघर्ष समिती असा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.