पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ वकिल असीम सरोंदेसह अनेकजण उपस्थित होते. परंतु, हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच कार्यक्रमाला गालबोट लागलं. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांवरही हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली.

पीडित जखमी महिलांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा या महिलांकडून करण्यात आला आहे. “प्रभात रोडपासून आमच्यार हल्ले करण्यात आले. आम्हाला पोलीस संरक्षण नव्हतं. भाजपाच्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केली. अंडी फेकली. महिलांची ओढाताण केली. भलामोठे दगड आमच्यावर बसला. कोणाच्या बोटाला लागलं तर कोणाच्या डोक्याला लागलं आहे”, असं पीडित महिला म्हणाली. महिलांना मारण्यासाठी भाजपा सरकार गुंड पाठवत आहेत. हे कोणतं राज्य आहे? असा संतप्त सवालही या महिलांनी विचारला.

हेही वाचा >> पुणे : निखिल वागळे यांची गाडी फोडली, गाडीवर शाईफेक

निखिल वागळेंवर हल्ला

निर्भय बनो या सभेचे राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आले आहे. निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना पुण्यात येण्यास विरोध केला होता. तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभा स्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले, तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर निखिल वागळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची काच फोडण्यात आली, गाडीवर शाईफेक करण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे. नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पण भाजपाने इतका काय धसका घेतला आहे की आज थेट हल्लाच केला? सत्ताधारी कायदा हातात घेत आहेत, हेच आम्ही सांगत आहोत यातून राज्यात तणाव वाढत आहे, जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे”, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.