अहिल्यानगर : कपाशी बियाणांच्या विक्रीमध्ये गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील ‘त्रिमूर्ती ॲग्रो सर्व्हिसेस’ या फर्मविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगामास सुरुवात होताच गैरप्रकार उघडकीस आल्याने कारवाई करण्यात आली आहे. कपाशीच्या मागणी असलेल्या महिको कंपनीच्या एमआरसी ७३५१ या वाणाचा काळाबाजार सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे यांनी या कारवाईची माहिती दिली. या विक्रेत्याकडील कपाशीच्या ५१ बियाणांच्या पाकिटांसाठी विक्रीबंदचा आदेश देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विक्री संबंधित देयके व ऑनलाइन व्यवहाराचे पुरावे सादर केल्यामुळे हा काळाबाजार उघड झाला. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे व नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप कोपनर यांनी पाचेगावमधील त्रिमूर्ती ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानाची तपासणी करत अनियमित विक्रीचे पुरावे गोळा केले. या कारवाईत तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनीही सहभाग घेतला.
दुकानाच्या तपासणीत महिको कंपनीचे कपाशीचे एमआरसी ७३९१ वाण अधिक दराने विक्री होत असल्याचे उघड झाले. शेतकऱ्यांकडील देयकाची तपासणी केली असता दुकानदाराने निर्धारित किमतीपेक्षा अधिक दर अकारल्याचे उघड झाले. तपासणीमध्ये खरेदी चलनावर कोणत्याही प्रकारचा बियाणे लॉट क्रमांक आढळला नाही तसेच दुकानातील साठा व भावफलक अद्ययावत नसल्याचेही आढळले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानात आढळलेल्या कपाशीच्या ५१ बियाणे पाकिटांवर विक्रीबंदचा आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी दिली. बियाणे विक्रीमध्ये गैरप्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ढगे यांनी केले आहे.
खते व बियाणे मुबलक
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई करू नये तसेच खते व बियाणे खरेदी करताना पक्के देयक घ्यावे व गैरप्रकार आढळल्यास तत्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा. बाजारात खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे