पंढरपूर : अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता सावळ्या विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे. यासाठी त्यांनी येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान माघी वारीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत पुढील काही दिवस ‘ऑनलाइन’ आणि ‘व्हीआयपी’ दर्शन बंद राहणार असल्याचेही औसेकर महाराज यांनी सांगितले.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शिवाजी मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री आदी उपस्थित होते. यानंतर समितीचे सह अध्यक्ष औसेकर महाराज यांनी पत्रकारांना माहिती दिली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिकांसाठी पहाटे सहा ते साडेसहा असा केवळ अर्धा तासाचा कालावधी होता. यात वाढ करून आता मंदिर समितीने पहाटे सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत स्थानिकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासह रात्री साडेदहा ते अकरादेखील स्थानिकांना सोडण्यात येणार आहे. तर अंध, अपंग, नवदाम्पत्य, अतिशय वृध्द, आजारी, गर्भवती महिलांनादेखील झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहन औसेकर महाराज यांनी केले.

मंदिर परिसरात महिलांसाठी बाथरूम नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याने यावर देखील तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले. या बैठकीमध्ये माघी एकादशी ८ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे यात्रेच्या आधी व नंतर काही दिवस ‘ऑनलाइन ’ व ‘व्हीआयपी’ दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संवर्धन कामासाठीही दर्शनवेळा बदलणार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असून यामुळे मंदिरातील काही भाग भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दोन्ही देवांचे गाभारे, सोळखांबी, चौखांबी येथील दगडांना लेप लावणे तसेच जमिनीवरील दगड सपाट करणे आदी महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. दगडांना लेप लावल्यावर तो सुकण्यास आठ तास लागतात तर त्याचा वास हा बारा तासापर्यंत राहतो. यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार दर्शन बंद ठेवण्याची मागणी करीत आहेत. परंतु मंदिर समितीकडून दर्शन बंद न ठेवता दर्शनाची वेळ कमी करावी का, यावर चर्चा झाली असून लवकरच या बाबत निर्णय होईल असे औसेकर महाराज यांनी सांगितले.