प्रबोध देशपांडे
अकोला : करोनामुळे निर्माण झालेल्या महामारीच्या काळात देहदान चळवळही विस्कळीत झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देहदान टाळण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्वीकारणे बंद करण्यात आले. देहदाना सारख्या अनमोल कार्यालाही करोनाचा जबर फटका बसला.

लोकांच्या मनातील परंपरांचा पगडा, शंका दूर सारीत आणि रुढींना छेद देऊन देहदान चळवळ बळकट होऊ पाहत आहे. राज्याच्या अनेक भागात गत काही वर्षांमध्ये देहदान व अवयवदाची जागरुकता वाढली. मात्र, या चळवळीने अजूनही अपेक्षित असलेला जोर धरलेला नाही. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी मानवी शरीराची आवश्यकता असते. भविष्यातील वैद्यकीय तज्ज्ञ याच मृतदेहावर शिक्षण घेत असतात. मृतदेहावरील संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय आविष्कार साकरले जातात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार आठ विद्यार्थ्यांमागे एक मानवी शरीर अभ्यासासाठी मिळावे, असे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात १२ ते १५ विद्यार्थ्यांमागे एक शरीर मिळत असल्याची वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिस्थिती आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्याालयाचा विचार केल्यास वर्षाकाठी १२ ते १३ देहदान होतात.

सध्या करोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे देहदान स्वीकारणे बंद करण्यात आले. देहदानानंतर मृत शरीरावर ‘इम्बॅलमिंग’ ही रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. यात करोनाचा संसर्ग पसरण्याचा मोठा धोका असल्याने ‘डब्ल्यूएचओ’च्या दिशानिर्देशानुसार त्यावर बंदी आहे. कुठल्या शरीराला करोनाचा संसर्ग झाला अथवा नाही, हे नमुन्यांच्या तपासणीशिवाय सांगता येत नाही. त्यामुळे देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून ‘डब्ल्यूएचओ’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार देहदानाची प्रक्रिया संपूर्णत: बंद करण्यात आली. पुढील काळातील गरज लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृत शरीरांची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे.

अभ्यास व संशोधन प्रभावित होणार
मृत मानवी शरीरावर वैद्यकीय अभ्यास व संशोधन करण्यात येते. अनेक प्रकारचे संशोधन, अभ्यास व नवनवीन शस्त्रक्रियांसाठी मृत शरीराचा उपयोग होतो. करोनाचा शिरकाव झाल्यापासून देहदान बंद करण्यात आले. आणखी किती काळ ते बंद राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम वैद्याकीय अभ्यास व संशोधनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देहदान स्वीकारण्यास असमर्थता
अकोल्यातील स्वातंत्र्य सैनिक रामसिंह राजपूत यांच्या पत्नी कमलाबाई राजपूत (८८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे देहदान करण्याचा मनोदय राजपूत कुटुंबीयांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे प्रक्रियाच बंद असल्याने वैद्यकीय महाविद्याालयाने देहदान स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. राजपूत कुटुंबीयांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करत तेरावीचा कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री सहायता निधीत १५ हजारांची मदत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सध्या सर्वत्र देहदान प्रक्रिया बंद आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालयात पुढील सत्रामध्ये पुरेल एवढे मृत शरीर उपलब्ध आहेत.
डॉ.सुधीर पंडित, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.