अलिबाग– गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता सुरज सिंह चौहान या नौदलातील जवानाचा मृतदेह अखेर सापडला आहे. नेरळ जवळील पाली भूतवली धरणाजवळ एका दरीत त्याचा मृतदेह आज शोध व बचाव पथकांना आढळुन आला. सुरजची हत्या झाली की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.

सुरजसिंह चौहान नौदलात जवान म्हणून कार्यरत होता. हा कुलाबा येथील डॉकयार्ड परिसरात एफटीटी युनिट मध्ये नेमणूक होती. तो कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात वास्तव्याला होता. आठ दिवसांपूर्वी तो ट्रेकिंगसाठी नेरळ माथेरान परिसरात आला होता. मात्र तिथून अचानक बेपत्ता झाला होता. नौदल आणि पोलीसांकडून त्याचा शोध सुरू होता. तो बेपत्ता असल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

पोलीस तपासात त्यांचा भिवपूरी रोड स्टेशन परिसरात त्यांचे मोबाईल लोकेशन आढळून आले होते. त्यामुळे नेरळ पोलीस, नौदल आणि त्यांचे नातेवाईक यांनी त्याचा शोध सुरू केला होता. गेल्या सात दिवसांपासून नेरळ माथेरान मधील जंगल भाग शोध पथकांनी पिंजून काढला होता. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्याचा ठावठिकाणा शोधला जात होता. मात्र शोध लागत नव्हता. त्याचा फोनही बंद असल्याने शोध घेणे अवघड झाले होते.

आज आठव्या दिवशी पाली भुतवली धरणा जवळ असलेल्या सातोबा मंदिरच्या पाठीमागील टेकडी लगतच्या दरीत त्याचा मृतदेह असल्याचे आढळून आला. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी संध्याकाळी हा मृतदेह दरीतून शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढला.

शवविच्छेदनासाठी हा मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची आहे. हा घातपात आहे की अपघात याचा तपास नेरळ पोलीस करणार आहेत.  सुरजसिंह चौहान हा मुळचा राजस्थान मधील बिवाणी येथील रहिवाशी होता. मे महिन्यात तो मुंबईत डॉक यार्ड येथे नियुक्तीवर आला होता.  ७ सप्टेंबरला सकाळी पाच वाजता तो घरातून निघुन गेला होता. त्याचा मोबाईल फोनही बंद येत असल्याने, नौदलाच्या वतीने कफ परेड पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याच्या रहस्यमय रित्या गायब होण्यामुळे सर्व जण चिंतेत होते.