नांदेड : ‘सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा’ या लक्षवेधी घोषवाक्यासह बांधकाम कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मदतीच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये बोगस लाभार्थी आणि दलालांचा शिरकाव झाला असून, त्यामुळे वरील घोषवाक्यात ‘सुळसुळाट दलालांचा’ या आणखी एका ओळीची भर पडली आहे.

नांदेडच्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शासनाच्या वरील योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यालयातील कामगार अधिकारी यांच्या अधिपत्याखाली बांधकाम कामगारांची नोंदणी व त्यांना शासकीय योजनेचा लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अलीकडे स्थानिक कामगार अधिकारी श्रीमती यास्मिन शेख यांनी काही प्रकरणांची पडताळणी केली असता, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे प्रकरण दाखवून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये चार बोनाफाईड प्रमाणपत्रे खोटी व बनावट असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर या महिला अधिकाऱ्याने संबंधित अर्जदारांविरुद्ध शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर केली. तथापि, अशा प्रकरणांत थेट गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक झाल्याचे त्यांना पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्यामुळे कामगार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्याचदिवशी म्हणजे ३० तारखेला गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर सतत पाच दिवस संबंधित अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या दप्तरी खेटे मारत होत्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गुरुवारी रात्री येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अखेर गुन्ह्याची नोंद झाली.

दरम्यान, वरील योजनेतील व्यापक गैरप्रकारांची माहिती शिवाजी गावंडे यांनी काही वार्ताहरांना कळविली होती. नांदेडसह राज्यभरात वरील योजनेमध्ये मोठी अनागोंदी माजली असून, बोगस लाभार्थी आणि दलालांच्या संगनमतातून शासकीय निधीची लूट सुरू असल्याचा गौप्यस्फोट गावंडे यांनी केला. त्यांच्या या म्हणण्याला कामगार विभागातील निःस्पृह अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. शासनाच्या फसवणुकीविरुद्ध धाडस करून तक्रार करायला समोर आलेल्या महिलेला या प्रकरणात मोठा मनस्ताप झाल्याचे दिसून आले.

स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील प्रकरणांत शासनाची दोन ते अडीच लाखांची फसवणूक झाली असती. पण जागरुकतेमुळे ती टळली असली, तरी यापूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये खोटी माहिती आणि बनावट कागदपत्रांआधारे कोट्यवधी रुपये उचलले गेले असावेत, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी सर्वंकष चौकशी केली तरच गैरप्रकार करणाऱ्यांना अटकाव होऊ शकेल, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कामगार अधिकाऱ्यांच्या वरील तक्रारीतील तपशील तपासल्यानंतर प्रस्तुत प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशी व तपासातून वस्तुस्थिती समोर येईल. जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.- सूरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड