Bombay High Court on Maratha Reservation Protest in Azad Maidan : मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायधीश चंद्रशेखर व आरती साठे यांच्या बेंचसमोर मुंबईतील आझाद मैदानात चालू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबतची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार दोघांनाही खडे बोल सुनावले. केवळ २४ तास आझाद मैदानात उपोषणाला बसण्याची परवानगी दिलेली असताना तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात? असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगेंच्या वकिलांसमोर उपस्थित केला.
दुसऱ्या बाजूला, “तुम्ही अजूनही आझाद मैदान व आसपासचा परिसर रिक्त का करू शकला नाहीत? आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी तुम्हाला जरांगे यांचीच मदत का घ्यावी लागतेय?” असे प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. दरम्यान, सदर प्रकरणाची सुनावणी उद्या (बुधवार, ३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यासाठी मनोज जरांगे यांच्या वकिलांनीच न्यायालयाकडे विनंती केली होती.
विधीज्ञ सतीश मानेशिंदे यांनी या सुनावणीवेळी मनोज जरांगे व मराठा आंदोलकांची उच्च न्यायालयाच बाजू मांडली. यावेळी न्यायालयाने मानेशिंदे व राज्य सरकारला फटकारलं.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर : कोणाच्या परवानगीने तुम्ही तिथे बसला आहात? तुम्ही तिथेच बसून न्यायालयाचा निर्णय बदलू शकत नाही.
सतीश मानेशिंदे : ९० टक्के आंदोलकांनी मुंबई सोडली आहे. त्यांची वाहनं देखील नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत.
न्यायमूर्ती चंद्रशेखर : पण तुम्ही अजूनही तिथे का बसला आहात? तुम्ही तिथेच ठाण मांडून बसू शकता का? तुम्हाला केवळ २४ तास तिथे उपोषण करण्याची परवानी दिली होती. पण तुम्ही अजूनही तिथे बसला आहात. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी का जाऊ शकत नाही?
सतीश मानेशिंदे : आम्ही आता आंदोलनाची जागा बदलू शकत नाही. आता त्या पाच हजार लोकांना एकत्र घेऊन दुसरीकडे जाणं शक्य होणार नाही.”
न्यायमूर्ती चंद्रशेखर : तुम्ही ५,००० लोक तिथे बसून उपाय निघणार आहे का? तुम्हा सर्वच्या सर्व ५,००० लोकांना तिथून जायला सांगावं लागेल. तुम्ही इतके लोक तिथेच ठाण मांडून बसू शकत नाही.
सतीश मानेशिंदे : महोदय, शासन स्तरावर चर्चा चालू आहे. लवकरच या सगळ्यावर उपाय शोधून काढला जाईल असं दिसतंय. आम्हाला थोडा वेळ द्या.
न्यायमूर्ती चंद्रशेखर : सर्व समर्थक मनोज जरांगे यांचं म्हणणं नक्कीच ऐकतील. तुम्हाला तिथे किती वेळ बसून देता येऊ शकतं ते आम्हाला पाहावं लागेल.
सतीश मानेशिंदे : कृपया या प्रकरणाची सुनावणी उद्या सकाळपर्यंत पुढे ढकलू शकता का? उद्या सकाळपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो.
न्यायमूर्ती चंद्रशेखर : कायद्याचं राज्य राखलं गेलं पाहिजे. न्यायालयाच्या आदेशाने तुम्ही तिथे बसला होता. त्यामुळे आम्ही तुम्हाला तिथून जबरदस्तीने हटवण्याचा आदेश देऊ इच्छित नाही. परंतु, तुम्ही देखील कायद्याचा आदर करायला हवा.
सतीश मानेशिंदे : कृपया सुनावणी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पुढे ढकलून आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही माइक व लाउडस्पीकरद्वारे आंदोलकांपर्यंत संदेश पोहोचवू. आताही ते करत असून बहुसंख्य आंदोलकांनी मुंबई सोडली आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर : तुम्ही (मनोज जरांगे) एक प्रभावी व्यक्तीमत्व आहात. तुमचा जनतेवर खूप प्रभाव आहे. तुमच्या विनंतीनुसार आम्ही हे प्रकरण उद्या सकाळपर्यंत पुढे ढकलत आहोत. उद्या सकाळी ११ वाजता या प्रकरणावरील पुढील सुनावणी घेतली जाईल.