प्रशांत देशमुख

वर्धा : जन्मलेली मुलगी ‘नकोशी’ झाल्याने तिला उघड्यावर फेकून दिल्याची असंख्य उदाहरणे पाहण्यात येतात, मात्र आता मुलगाही ‘नकोसा’ झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. जन्माला येऊन चौदा तास झालेल्या व कचऱ्यात सापडलेल्या नवजाताचा मृत्यूशी संघर्ष सुरू असून त्याला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारंजा तालुक्यातील बोनदरठाना या गावी आज पहाटे दोन वाजता नवजात अर्भक आढळले. गावातील गजम यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेस भल्या पहाटे बाळ रडण्याचा आवाज आला. ती कुटुंबीयांसह शोध घेण्यास घराबाहेर पडली, तेव्हा नाळ ओली असलेल्या अवस्थेत बाळ दिसले. ते मातीने भरले होते. कचऱ्यात पडलेल्या बाळास पाहून सर्वांचे हृदय द्रवले. आशा सेविकेस माहिती देण्यात आली, ती आल्यानंतर थक्क झाली. पहाटेच्या गार वाऱ्यात चिमुकला जीव थंडगार पडलेला पाहून सेविकेची धावपळ सुरू झाली. पोलिसांना माहिती देत बाळास लगतच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. बाळाचा जीव वाचवण्यासाठी लगबग सुरू झाली. आईचे दूध शक्यच नसल्याने पावडरच्या दुधाचा पर्याय तपासला, ते बाळाने नाकारले. तज्ज्ञांची मदत घेण्यासाठी बाळास वर्धेच्या सामान्य रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. नवजात बाळ सध्या मृत्यूशी संघर्ष करीत असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. नवजात बाळाच्या आईचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.