नागपूरमध्ये एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक इंगळेचे मृत महिलेसोबत प्रेमसंबंध होते. २३ तारखेला दीपक या महिलेला घेऊन हिंगणा भागातील रुई शिवारात गेला होता. तिथे त्याने या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली. हत्या केल्यावर दीपक तिथून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २३ मार्चला सुषमा काळवंडे ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दीपक इंगळे आणि सुषमा यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दीपकला आम्ही पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. चौकशी करत असताना त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा दीपकने गुन्हा कबूल केला. २३ तारखेला रुई येथील शिवारात दीपकने तिला आणलं होतं. त्याने तिथे तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिला संपवलं. तो तिथून पळून घरी गेला होता. त्यानंतर चौकशीकरीता आल्यावर जेव्हा दीपकने गुन्हा कबूल केला तेव्हा त्याला अटक करण्यात आली आहे. दीपक इंगळेला अटक केल्यानंतर पोलीस त्याला ज्या ठिकाणी खुनाची घटना घडली त्या रुई शिवारात घेऊन आले होते. रुई शिवारात दीपक इंगळेने सुषमाची कुठे हत्या केली ती जागा दाखवली अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.