तब्बल नऊ महिन्यानंतर सुरू झालेल्या जांभरूण रस्त्याचे काम निकृष्ट असून, मजबुतीकरण न करता थेट डांबरीकरण करण्यात आले आहेत. दरम्यान, या कामात दोन तासांमध्ये कशीबशी गिट्टी टाकून डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे रस्ता उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे.
ऑगस्ट २०१४ मध्ये शहरातील सुमारे १ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी जांभरूण रस्ता ते डॉ. असराणी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. ऑगस्ट ते एप्रिलपर्यंतच्या नऊ महिन्याचा काळ उलटूनही रस्त्याचे काम सुरू झाले नाही. नगराध्यक्षांच्याच प्रभागातील हा रस्ता असल्याचे वृत्तामधून निदर्शनास आणून दिल्यानंतर या रस्त्यांच्या कामाबाबत हालचालींना वेग आला. गुरुवारी दुपारी बुलडोझरने ढाप्याजवळील माती काढून थेट गिट्टी टाकण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. ‘ या रस्त्याचे काम योग्यप्रकारे सुरू आहे. तांत्रिक मान्यतेनुसार हे गिट्टी व डांबरीकरणाचे काम होणार आहे. दबाई व मजबुतीकरणाबाबत कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. निकृष्ट कामामुळे रस्ता लवकरच उखडण्याची शक्यता आहे. गिट्टी पसरवून त्यावर मुरूम टाकून कशीतरी दबाई करण्याचा प्रकार गुरुवारी सुरू होता. यावेळी पाण्याचा वापरही कमी करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.