पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

येस बँक, डीएचएफएल फसवणूक प्रकरणी ३० एप्रिल रोजी सीबीआयने भोसलें यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले होते.

Avinash-Bhosale
अविनाश भोसले

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफल प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भोसलेंच्या घरावर टाकण्यात आला होता छापा

येस बँक, डीएचएफएल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी ३० एप्रिलला शोधमोहीम राबवली होती. पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले होते. सीबीआयने याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय छाबरिया यांना अटक केली होती. छाबरिया ६ मेपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत. छाबरिया हे रेडिअस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. डीएचएफएलमधून त्यांनी मोठे कर्ज घेतले होते. त्यातील तीन हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मार्च २०२० मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. 

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले यांची बांधकाम व्यवसायिक म्हणून पुण्यासह राज्यात ओळख आहे. तसेच ते काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. एवढचं नाही तर अविनाश भोसले यांचे सगळ्याच पक्षातील अनेक राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. या संबंधामुळे ते नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या कारवाईमुळे भोसले अडचणीत सापडले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Businessman avinash bhosale arrested by cbi in dhfl case dpj

Next Story
कोल्हापूरचे छत्रपती घराणे कोणत्याही तणावात नाही – युवराज कुमार शहाजीराजे
फोटो गॅलरी