नांदेड : पुणे ही व्यावसायिक कर्मभूमी आणि मग हळद बेण्याच्या विक्री व्यवसायातून नांदेडजवळच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जम बसविणारे उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण उसाच्या मळ्यात गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात या कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एकमेव साखर निर्मिती उद्योग अशी ओळख सांगणार्‍या या कारखान्यामध्ये आधी मोहनराव पाटील मुदखेडकर आणि त्यांच्यानंतर गणपतभाऊ तिडके या ग्रामीण आणि कृषी पार्श्वभूमीच्या मातीतील कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या घराण्यातील एक ‘उद्योगी’ व्यक्ती प्रथमच अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.

माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वासह त्यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली चालणारा हा कारखाना प्रचंड कर्ज आणि तोट्याखाली चालला आहे. या कारखान्याचा सन २०२४-२५चा गाळप हंगाम सरल्यानंतर दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या तिडके यांनी अलीकडे अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन दैनंदिन कटकटींतून आपली सुटका करून घेतली. नंतर संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आणि शुक्रवारी त्यांच्या रिक्त जागी चव्हाण घराण्याचा झेंडा नरेन्द्र यांनी फडकविला.

अशोक चव्हाण यांच्या सौभाग्यवती काही काळ वरील कारखान्यात उपाध्यक्ष होत्या; पण तेव्हा एका प्रकरणात संचालक मंडळ अडचणीत येताच त्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नंतर अलीकडे याच परिवारातील नरेन्द्र चव्हाण उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांना अध्यक्षपदी बसवून खा.चव्हाण यांनी कारखान्यातील एका सशक्त लॉबीला धक्का दिला आहे.

‘भाऊराव चव्हाण’च्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया साखर सह संचालक कार्यालयाचे अनुभवी अधिकारी विश्वास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या बैठकीत जेमतेम पाऊण तासात पूर्ण झाली. वरील पदासाठी केवळ नरेन्द्र चव्हाण यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियोजित बैठकीचे आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून देशमुख कारखाना स्थळावरून नांदेडला आले. या दरम्यान खा.अशोक चव्हाण कारखानास्थळी आल्यानंतर त्यांनी नवे चेअरमन या नात्याने आपल्या पुतण्याचे स्वागत आणि कौतुक केले. शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातल्या अनेक साखर सम्राटांना अंगावर घेतले होते. आता नव्या काळात त्यांच्या थोरल्या बंधूंचा नातूच ‘साखर सम्राट’ झाला आहे.