Acharya Devvrat : महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारताच्या उपराष्ट्रपती पदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे.
सी.पी राधाकृष्णन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत. या संदर्भातील निवदेन राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलं असून या संदर्भातील वृत्त द हिंदूने दिलं आहे.
निवेदनानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्तव्याव्यतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तसेच सी.पी. राधाकृष्णन यांची गुरुवारी (११ सप्टेंबर) उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यामुळे त्यांनी राज्यपाल पद सोडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Acharya Devvrat, Governor of Gujarat, to discharge the functions of the Governor of Maharashtra, in addition to his own duties as Vice President-elect, C. P. Radhakrishnan demits the office of Governor of Maharashtra. pic.twitter.com/nP8IeYhrVm
— ANI (@ANI) September 11, 2025
देशाचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास कसा आहे?
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. सीपी राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन आहे. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. राधाकृष्णन यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे.
राधाकृष्णन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भारतीय जनसंघाचेही सदस्य होते. ते २००४ ते २००७ पर्यंत तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. राधाकृष्णन १९७४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी जनसंघात सहभागी झाले होते. त्यांनी आरएसएसचे तिरुपूर शहर संघ प्रमुख, तालुका संघ प्रमुख आणि जिल्हा संघ प्रमुख म्हणूनही काम केले आहे. २०२३ मध्ये राधाकृष्णन यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पुढे जुलै २०२४ मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. राधाकृष्णन १९९८ मध्ये कोइम्बतूरमधून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले होते. पुढे १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता.
आरएसएसचे स्वयंसेवक ते उपराष्ट्रपती
१९७४ मध्ये ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य.
१९९६ मध्ये तमिळनाडूतील भाजपाच्या सचिवपदी नियुक्ती.
१९९८ मध्ये कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी.
१९९९ मध्ये कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय.
२०२३ मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
२०२४ महाराष्ट्राचे राज्यपाल.
२०२५ देशाचे उपराष्ट्रपती.