मुंबई : उपराष्ट्रपतीपदाची संधी मिळणारे सी. पी. राधाकृष्णन हे राज्याचे दुसरे राज्यपाल ठरले आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असतानाच शंकर दयाळ शर्मा यांची १९८७ मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. उभयतांमध्ये योगायोग असा की दोघांचीही आधीच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याने या पदावर निवड झाली किंवा होणार आहे.

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय मंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ३१ जुलै २०२४ मध्ये नियुक्ती झाली होती. त्यांच्या राज्यपालपदास अलीकडेच एक वर्ष पूर्ण झाले. १ वर्ष १७ दिवस ते राज्यपालपदी आहेत. यापूर्वी शंकर दयाळ शर्मा यांची राज्याचे राज्यपालपदी असताना उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.

एप्रिल १९८६ ते सप्टेंबर १९८७ या काळात ते राज्याचे राज्यपाल होते. आर. वेंकटरामन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध उपराष्ट्रपतीपदी निवड झाली. पुढे पाच वर्षाने १९९२ मध्ये शर्मा यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. सी. पी. राधाकृष्णन यांना भाजपने संधी दिली आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने होणाऱ्या निवडणुकीत राधाकृष्णन यांची निवड होणार हे निश्चित मानले जाते. कारण भाजप आणि रालोआकडे पुरेसे संख्याबळ आहे.

वादापासून दूर

सी. पी. राधाकृष्णन हे नेहमीच वादापासून दूर राहिले आहेत. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असताना राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. पण अन्य बिगर भाजपशासित सत्ता असलेल्या राज्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री वाद नित्याचेच झाले आहेत. पण राधाकृष्णन यांनी वादापासून दूर राहण्यावर भर दिला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे वादग्रस्त राज्यपाल होऊन गेले. त्या तुलनेत भाजप सरकारच्या काळातील विद्यासागर राव, रमेश बैस वा राधाकृष्णन यांची कारकीर्द कधीच वादग्रस्त ठरली नाही.

तमिळनाडूच्या राजकारणावर परिणाम

सी. पी. राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडूचे. कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तमिळनाडूत अनेक प्रयत्न करूनही भाजपला पाय रोवता आलेले नाहीत. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजप प्रचारात मुद्दा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी झालेल्या निवडीचा ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने मुद्दा केला होता. तमिळनाडूत हाच प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.