OBC Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर अखेर राज्य सरकारने जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय सरकारने जारी केला. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तसेच राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना काही ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसींसाठी देखील आता मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

“मराठा समाजाच्या संदर्भात राज्य सरकारने जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या उपसमितीचा मी जसा सदस्य होतो, त्याच पद्धतीची एक उपसमिती आता ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये आणि ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी उपसमिती असावी अशी मागणी होती. त्या प्रमाणे आता पुढील एक ते दोन दिवसांत ओबीसींसाठी एक उपसमिती गठीत होणार आहे”, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

“खरं तर ओबीसी समिती गठीत करण्याचा निर्णय हा मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. आज त्याची पुर्तता होत आहे. मात्र, या समितीचा अध्यक्ष कोण असेल? किंवा त्या समितीत सदस्य कोण असतील? याची मला कल्पना नाही”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला का?

जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय सरकारने जारी केल्यामुळे ओबीसी नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. कारण छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची चर्चा आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, “छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला का नव्हते? याची मला काही कल्पना नाही.”