वाई : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक २१ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत. आज वैध २४३ उमेदवारी अर्जापैकी १९७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.  कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आणि आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या पॅनलची आज घोषणा केली. दोघांनीही आपल्या पॅनेलमध्ये तुल्यबळ उमेदवारांना संधी दिल्याने निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणुकीसाठी वैध २४३ उमेदवारी अर्जापैकी १९७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर २१ जागांसाठी ४६ उमेदवार  राहिले. सत्ताधारी पॅनेलमधून कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, संचालक चंद्रकांत काळे, प्रताप यादव, चंद्रसेन शिंदे, प्रवीण जगताप, रतन शिंदे, नवनाथ केंजळे, चंद्रकांत इंगवले, विजया साबळे, आशा फाळके या दहा संचालकांना पुन्हा संधी दिली आहे. मदन भोसले यांनी यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे अनेक वर्ष संचालक राहिलेले नारायणराव पवार यांचे पुतणे जयवंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आहे.

तर आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनीही अत्यंत तुल्यबळ उमेदवार आपल्या पॅनेलमध्ये घेऊन मदन भोसले यांना चांगले आव्हान दिले आहे.  त्यांच्या पॅनेलमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यांच्या पॅनलमधून आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, प्रमोद शिंदे, किरण काळोखे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, सरला वीर, संदीप चव्हाण, हनुमंतराव चौरे, शिवाजी जमदाडे आदींना उमेदवारी दिली आहे.  दोन्ही पॅनेलनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दि ३ मे रोजी मतदान असून दि ५ मे रोजी मतमोजणी होणार आहे . कारखान्याचे उत्तर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या पाच तालुक्यातून कारखान्याचे ५२ हजार सभासद आहेत. त्यामुळे या तालुक्यातून येणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, महेश शिंदे आदींचाही निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidates kisan veer seats satara cooperative sugar factory election ysh
First published on: 20-04-2022 at 00:02 IST