लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने अखेर डॉ. सुनील गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे येथे तीव्र पडसाद उमटले. उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी उघड नाराजी व्यक्त करून राजीनामा देण्याचा इशारा दिला.
लातूर लोकसभेसाठी गोपीनाथ मुंडे व नितीन गडकरी यांची एकमेकांवरील कुरघोडी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती. अखेर मुंडे गटाला पुण्यात, तर गडकरी गटाला लातूरमध्ये संधी देऊन पक्षश्रेष्ठींनी वाद मिटवला. रविवारी रात्री जिल्हय़ाच्या विविध भागांत फटाके फोडून डॉ. गायकवाड यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले. मात्र, या उमेदवारीबद्दल उदगीरचे आमदार भालेराव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. भालेराव यांची नाराजी दूर करण्याचा भाजपच्या ज्येष्ठ मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवला. डॉ. गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता कामाला लागता येईल, अशी भावना कार्यकत्रे व्यक्त करीत आहेत.