अलिबाग- जादूटोणा आणि देवदेवस्की करून अडचणी सोडवण्याच्या हमी देऊन तिघांची ४० लाखांना फसवणूक केल्याची बाब अलिबाग शहरात समोर आली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखव करण्यात आला आहे. पोलीसांनी चौघांनाही अटक केली असून , पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सूरू आहे. सधन कुटूंबातील मात्र अडल्या नडलेल्या लोकांना हेरून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक करण्याचा उद्योग महेश यशवंत मोरे यांनी अलिबाग तालुक्यातील ठिकरूळ नाक्याजवळ सुरू केला होता. त्यांची पत्नी अपुर्वा मोरे, दोन मानसपुत्र मिहीर मांजरेकर उर्फ मिहीर मोरे आणि सागर कुंड त्यांना यात सहकार्य करत होते.

पनवेल येथे राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिक असलेल्या फिर्यादी यांचे अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी कामे सुरू होती. या कामांचे पैसे अडकून पडले होते. हे पैसे लवकर मिळवून देण्यासाठी विवीध देवदेवस्की आणि जादूटोणा करण्याचा सल्ला दिला.  त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. तर दुसऱ्या एका सधन कुटूंबाला त्यांच्या कौटुंबिक वाद मिटावे आणि शांतता व स्थैर्य लाभावे यासाठी मंतरलेले दगड घराभोवती पुरून उपाययोजना करण्यास सांगितले, यासाठी २ लाख २५ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. आणखिन एकाची व्यक्तीची  १ लाख २९ हजारांना फसवणूक केल्याची बाब समोर आली. महत्वाची बाब म्हणजे या कुटूंबांचा विश्वास संपादन करून एक जेसीबी आणि एक थार गाडीही या मांत्रिकांने स्वतःकडे मागून घेतल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणी महेश मोरे यांच्यासह चौघांविरोधात महाराष्ट्र नरबळी, आणि इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ आणि भारतीय न्याय संहिता मधील विवीध कलम अंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी या गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक केली आसून त्यांना शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तीन तक्रारदार समोर आले आहेत. पण  या चौघांकडून आणखिन काही जणांची फसवणूक झाली आसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबधित व्यक्तींनी अलिबाग पोलिसांशी संपर्क साधावा. गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती केली आहे. यातील सर्व बाजू तपासून पाहत आहोत.- किशोर साळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे</strong>