गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं नवाब मलिक यांना अटक केली असून सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचं वातावरण तापलेलं असतानाच भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात थेट शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं विधान केलं आहे. आमदार नितेश राणे यांच्याकडून देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे?

निलेश राणे यांनी शरद पवारांचा संबंध थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शनिवारी केलेल्या वक्तव्यात ते म्हणाले होते, “मला संशय येतो की शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरंच संशय येतो. ज्यांनी व्यवहार केला, दाऊदच्या बहिणीला पैसे दिले, दाऊदच्या माणसांना पैसे दिले, बॉम्बब्लास्ट करणाऱ्या माणसांना पैसे दिले. अनिल देशमुखांनी काय केलं होतं? कसा झट की पट राजीनामा घेतला होता. विचार केला होता का? मग नवाब मलिक कोण आहे? ज्यांनी दाऊदशी व्यवहार केला. की अशी भीती आहे की नवाब मलिक खरं बोलले, तर शरद पवारांविषयी माहिती बाहेर येईल? असं काही आहे का?”

“कदाचित नवाब मलिकच दाऊदचे फ्रंटमॅन…”, भाजपा नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिकांवरही केला होता आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर देखील दाऊद इब्राहिमचा फ्रंटमॅन असल्याचा आरोप केला होता. “या व्यवहारानंतर मुंबईत तीन बॉम्बस्फोट झाले. दाऊदच्या माणसाकडून तुम्ही कवडीमोल भावाने मालमत्ता घेता. त्यात १०० टक्के काळा पैसा आहे. दाऊद देशाचा एक नंबरचा शत्रू, तुम्ही त्याच्याकडून मालमत्ता विकत घेता. कुणाला माहीत, दाऊद इब्राहिमचा खरा फ्रंटमॅन नवाब मलिकच असतील. दाऊदला जर रिअल इस्टेटच्या क्षेत्रात घुसखोरी करायची असेल, तर त्याला नवाब मलिक यांच्यासारखा फ्रंटमॅन हवाच आहे”, असं निलेश राणे म्हणाले होते.