अलिबाग: अडल्या नडलेल्यांना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय पिता पुत्रांनी केला होता. त्याबदल्यात अवाजवी व्याजाची वसूली या दोघांकडून केली जात होती. त्यांच्या सावकारीच्या दृष्टचक्रात अनेक जण भरडले जात होते. सहायक निबंधकांच्या तक्रारीनंतर आता दोघांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण येथील सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व त्याचा मुलगा भरत पाटील यांचा सावकारकीचा जाच अनेक वर्ष पेणच्या जनतेमध्ये सुरू होता. लोकांना काही रक्कम देऊन त्याबदल्यात अवाजवी व्याज ह्या सावकारांकडून बळजबरीने वसूल केला जात होता. अखेर ह्या दोन्ही सावकारांच्या जाचाला कंटाळून पेण मधील दोन तरुणांनी दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग व सहाय्यक निबंधक पेण यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली.

दोघांच्या घरी, हॉटेल मध्ये आणि कार्यालयात ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत दरम्यान दोघांकडे कारारनामे, कोरे चेक्स, मालमत्तांची कागदपत्र, चिठ्या, स्टॅम्प पेपर, सावकारी पावती बुक, सावकारी प्रॉमिसरी नोटबुक, कर्जाची खतावणी बुके कोरे चेक अशी अनेक कागदपत्र आढळून आली. ज्यात दोघांनी उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तींचा भंग करून, कर्ज वितरण केल्याचे दिसून आहे. कार्यक्षेत्राबाहेर कर्ज देणे, त्याबदल्यात अवाजवी व्याज आकारणी करून लोकांची पिळवणूक सुरू असल्याचे समोर आले. महाराष्ट्र सावकारी अधिनिमयकचे उल्लघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

त्यानुसार सहाय्यक निबंधक पेण यांनी सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम मधील विविध कलमांतर्गत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. सुर्यकांत जोमा पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर भरत सुर्यकांत पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्याकडे पेण मधील दोन तरुणांनी या सावकारांविरोधात बाबतच्या लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि जिल्हा उप निबंधक कार्यालयाने सावकारी करणाऱ्या पिता पुत्रांच्या घरी, कार्यालयात आणि हॉटेल मध्ये छापा टाकला होता. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मंगळवारी सकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला. पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे सावकारांकडून अवाजवी व्याज आकारणीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. जिल्ह्यातील इतर भागातही अशाच पध्दतीने सावकारांकडून अवाजवी व्याज आकारणी होत आहे का याची तपासणी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.