सोलापूर : सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये गेल्या १८ मे रोजी सेंट्रल टेक्सटाइल नावाच्या टॉवेल कारखान्यास झालेल्या भीषण अग्निकांडात कारखान्याच्या वयोवृद्ध मालकासह त्यांचे कुटुंबीयांतील चौघांसह चार कामगार असे आठजणांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी अखेर पोलिसांनी कारखान्याच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार कारखान्याचे मृत मालक हाजी उस्मानभाई हाशमभाई मन्सुरी (वय ८७) यांच्यासह हनीफ उस्मानभाई मन्सुरी आणि त्यांच्या पत्नी इशरत मन्सुरी यांच्यावर कारखान्यातील अग्निकांडाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मन्सुरी कुटुंबीय चालवित असलेल्या या कारखान्यात विनापरवाना बांधकाम करून स्वतःच्या आणि कामगारांसाठी निवास करण्याची परवानगी नसताना तेथे बेकायदेशीर निवास केला जात होता.
कारखान्यातील सुरक्षिततेविषयी कोणतीही काळजी न घेता हयगय आणि निष्काळजीपणा केल्यामुळे घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत कारखान्याचे मालक हाजी उस्मानभाई मन्सुरी यांच्यासह त्यांचे नातू अनस हनीफ मन्सुरी, नातसून शिफा अमन मन्सुरी आणि पणतू युसूफ अनस मन्सुरी तसेच कामगारांपैकी मेहताब सय्यद बागवान, त्यांचा मुलगा सलमान बागवान, हिना मेहताब बागवान आणि आशाबी मेहताब बागवान अशा आठजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मृत उस्मानभाई मन्सुरी यांच्यासह त्यांचे पुत्र हनीफ मन्सुरी आणि सून इशरत मन्सुरी या तिघांना आरोपी करण्यात आले आहे. यात तिन्ही मालकांच्या नावाने कारखान्यात प्रत्येकी एक प्रमाणे तीन भूखंडाचा परवाना आहे.