कराड: अनाथाश्रमाच्या नावाखाली महिलेला देहविक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या संशयित महिलेवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र अशोक देशमुख यांनी याबाबतची फिर्याद दिली असून मतिमंद, तसेच अपंग मुलीला मारहाण करून तिला वैद्यकीय उपचारापासून वंचित ठेवत शारीरिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टेंभू, (ता. कराड) येथे अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेने परपुरुषांशी अनैतिक संबंध ठेवण्यास, तसेच देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची फिर्याद दोन दिवसांपुर्वी एका महिलेने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी अनाथाश्रम चालवणारी ती महिला व वाल्मिक महादेव माने (रा. म्हासोली, ता.कराड) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिसांनी या महिलेच्या आश्रमावरही छापा टाकला असता तेथे एक मतिमंद मुलगी व तिची आजी आढळून आली. त्यांना पोलिसांनी शासकीय वसतिगृहात पाठवले आहे.

हेही वाचा >>> छत्रपती संभाजीनगर : ‘अजिंठा बँके’तील ९७.४१ कोटींचा घोटाळा; आठ आरोपींना पोलीस कोठडी

दरम्यान, संशयित महिलेच्या काही चित्रफिती समाज माध्यमांत प्रसारित झाल्या आहेत. त्यामध्ये ती महिला एका मतीमंद मुलीकडून घरकाम करून घेत असल्याचे, तसेच मुलीला मारहाणही करून तिच्याकडून पाय दाबून घेत असल्याचेही दिसून येत आहे. तसेच एका चित्रफितीमध्ये मतिमंद मुलीला ही महिला दारूच्या बाटल्या डब्यात ठेवायला सांगत असल्याचेही दिसून येत होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख यांनी याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. पिडीत मुलगी मतिमंद असल्याची माहिती असूनही तिच्या असहाय्यपणाचा गैरफायदा घेत या महिलेने तिला मारहाण करून वैद्यकीय उपचारापासून वंचित ठेवले. घरातील वेगवेगळी कामे करून घेतली. तसेच मुलीचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांची भूमिका संशयास्पद !

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी आज गुरुवारी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की टेंभू (ता. कराड) येथे रेखा सकट ही महिला अनेक वर्षांपासून दारू विक्री करीत आहे. याबाबत स्थानिकांनी अनेकदा ग्रामीण पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. मात्र, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. सध्या आश्रमाच्या माध्यमातून ही महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच रेखा सकट यांच्या अवैद्य व्यवसायाबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे आजवर अवैद्य व्यवसायांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्या कठोर कारवाई करावी, अशी मागणी करताना अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी या निवेदनात दिला आहे. निवेदनाच्या प्रति पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्हाधिकारी  व पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.