संदीप आचार्य

‘पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत योजने’अंतर्गत राज्यात आगामी तीन वर्षात २७ लाख ९५ हजार २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मात्र करोनाकाळात दोन वर्षे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने जवळपास दोन लाखाहून अधिक वृद्धांची अंधत्वाकडे वाटचाल सुरू असून ज्यांचे मोतीबिंदू पूर्ण पिकले आहेत अशा रुग्णांची युद्धपातळीवर शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोतीबिंदू मुक्त भारत योजनेसाठी संपूर्ण देशाचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून यात आगामी तीन वर्षात देशभरात जवळपास दोन कोटी ७० लाख शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प आहे. यात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे ५५ लाख ४८ हजार ५०० शस्त्रक्रिया केल्या जाणार असून त्या पाठोपाठ महाराष्ट्रात २७ लाख ९५ हजार २०० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये २३ लाख १९ हजार शस्त्रक्रिया, मध्यप्रदेशमध्ये १७ लाख तीन हजार ७०० शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. बिहार राज्यात १४ लाख ६० हजार ९०० तर अरुणाचलमध्ये १० लाख एक हजार शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तामिळनाडू व तेलंगणामध्ये अनुक्रमे १८ लाख सात हजार व १४ लाख ७५ हजार ६०० शस्त्रक्रिया केल्या जातील.

महाराष्ट्रातील मोतीबिंदूच्या २७ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आगामी तीन वर्षांच्या नियोजनासाठी शिस्तबद्ध काम सुरु केले आहे. यात २०२२-२३ मध्ये राज्यात ७,६४,४११ रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत तर २०२३-२४ मध्ये ९,३१,८१५ आणि २०२४-२५ मध्ये १०,८७,०११ शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच खाजगी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आगामी तीन वर्षात या सर्व शस्त्रक्रिया आम्ही पूर्ण करू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यापूर्वी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला होता. त्यावेळी १७ लाख शस्त्रक्रियांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. यातील बहुतेक शस्त्रक्रिया या करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रात २०१६-१७ पासून आरोग्य विभागाच्या माध्यमातून दरवर्षी साडेसात लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. यात करोनाची मागील दोन वर्षे वगळता ९१ टक्के ते ९७ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसून येते. तथापि राज्यात २०२०-२१ मध्ये २,२८,९९१ तर २०२१- २२ मध्ये ३,९३,७८० शस्त्रक्रिया पार पडल्या. यात आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचा वाटा नगण्य होता. करोनाकाळात आरोग्य विभागाची सर्व रुग्णालये ही कोविड रुग्णालये घोषित करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता मोतीबिंदूसह अन्य कोणत्याही शस्त्रक्रिया या रुग्णालयात झाल्या नाहीत. परिणामी ग्रामीण व दुर्गम तसेच आदिवासी भागातील असंख्य गोरगरीब रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यातील मोठ्या संख्येने रुग्णांचे मोतीबिंदू पूर्ण पिकले असून त्यांची तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. अन्यथा हार्ड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे अशक्य होऊन या रुग्णांना अंधत्व येऊ शकते. असे अंदाजे दोन लाखाहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावर तात्काळ उपाययोजना म्हणजे शस्त्रक्रिया करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राज्यात आजघडीला ६९ नेत्रपेढ्या, ७७ नेत्रसंकलन केंद्र , १६७ नेत्र प्रत्यारोपण केंद्र कार्यरत आहेत तर ९८ शासकीय नेत्र शस्त्रक्रियागृह आहेत. दुर्दैवाने या शस्त्रक्रियागृहांपैकी सध्या केवळ ३८ ठिकाणीच शस्त्रक्रिया होतात. यामागे शस्त्रक्रियागृहाची दुरुस्ती, पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसणे आदी अनेक कारणे आहेत. आरोग्य विभागात वर्ग १ च्या नेत्रतज्ज्ञांची बहुतेक सर्व पदे रिक्त आहेत. याशिवाय मंजूर ५२ नेत्रतज्ज्ञांपैकी ३२ पदे रिक्त आहेत तर नेत्र अधिकार्यांच्या ६९१ पदांपैकी ११६ पदे भरण्यातच आलेली नाहीत. याशिवाय परिचारिका व वॉर्डबॉय आदी पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. परिणामी करोनाकाळात जेथे वार्षिक ९० हजार शस्त्रक्रिया व्हायच्या तेथे आज केवळ २३ हजार २६३ शस्त्रक्रिया गेल्या वर्षी होऊ शकल्या. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना याबाबत विचारले असता नेत्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच रिक्त पदे भरण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालू असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी तीन वर्षांत २७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाची जबाबदारी विख्यात नेत्रशल्यचिकित्सक पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्यावर सोपवली असून त्याबाबतचे आदेशही जारी केले आहेत. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, खाजगी व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्याचे उद्दिष्ट व अंमलबजावणी योजना आखणे आदी सर्व जबाबदारी डॉ लहाने यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यानुसार २०२२-२३ मध्ये आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून १,९४,११४ शस्त्रक्रिया केल्या जातील तर स्वयंसेवी संस्था व खाजगी सहभागातून अनुक्रमे २,३६,११४ व ३,८८,२२५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. २०२३-२४ मध्ये आरोग्य व वैद्यकीय विभाग २,३२,९६१ तर स्वयंसेवी संस्था व खाजगी सहभागातून २,३२,९६१ व ४,६५,९२८ शस्त्रक्रिया केल्या जातील. २०२४-२५ साली राज्यात आरोग्य व वैद्यकीय विभाग २,७१,७६१ शस्त्रक्रिया करेल तर स्वयंसेवी संस्था व खाजगी सहभागातून अनुक्रमे २,७१,७६१ आणि ५,४३,५२४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.