scorecardresearch

केंद्राने महागाई नियंत्रणात ठेवावी, अन्यथा गंभीर परिणाम; शरद पवार यांची टीका

देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली असून केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

नांदेड : देशात कधी नव्हे एवढी महागाई वाढली असून केंद्र सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारची भूमिका घेत आहे, ती कदापिही योग्य नाही, असे सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

पवार यांनी येथील सह्याद्री विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले, की ज्यांना महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास माहिती नाही, असे लोक शांततेत राज्य चालत असताना नवीन प्रश्न निर्माण करत आहेत, त्यांचा आम्ही निषेधच करतो. राज्यातील अतिरिक्त उसाचे गाळप करण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील असून कारखाने बंद करू नयेत, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत असून पुढील पाच वर्षे आणखी सरकार राहील, असे ते या वेळी म्हणाले. नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे नेहमी तारखा, वेळ देतात हे आम्ही ऐकत आलो आहोत, तसेच पाहत आलो आहोत, त्यामुळे आम्ही फक्त त्यांना ‘एन्जॉय’ करतो, असे म्हणत पवार यांनी राणे, पाटील दुकलीची खिल्ली उडविली.

राष्ट्रीयीकृत बँकांचा सर्वसामान्यांकडे पाहण्याचा सहानुभूतीचा दृष्टिकोन असला पाहिजे, कृषिसंस्था, नागरी बँका यांच्या बाबतीतही रिझव्‍‌र्ह बँकेने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. राज्य व देशात सध्या व्यक्तिगत संघर्षांचे काम केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे व माझ्यामध्ये मतभेद होते; पण त्यात व्यक्तिगत संघर्ष कधीही नव्हता. केंद्र सरकारकडून ज्या प्रकारची भूमिका घेतली जात आहे, ती योग्य नाही. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या बाबतीत केलेल्या कारवाई बद्दल पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे ते या वेळी म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतची भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करून ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, डॉ. सुनील कदम, शंकर धोंडगे, वसंत सुगावे आदींची उपस्थिती होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Center control inflation otherwise serious consequences criticism sharad pawar ysh

ताज्या बातम्या