केंद्र सरकारने बिहारसाठी सव्वा लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. जर त्यांना इतकी भरघोस मदत केली जाऊ शकते तर, केंद्राकडून मराठवाड्यालाही अशीच मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठीच्या उद्धव यांच्या दौऱ्याला शनिवारपासून प्रारंभ झाला, यावेळी ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते. सरकारने दुष्काळासाठी अनेक घोषणा केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणीदेखील होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने उपाययोजना हाती घेण्याची गरज असल्याचे उद्धव यांनी सांगितले. दुष्काळाला तोंड द्यायचे असेल तर सध्या आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आत्ताच्या दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करायला हव्यात. त्यानंतर सरकारने सिंचन आणि पाण्याच्या नियोजनाचे दीर्घकालीन प्रश्न सोडवावेत, असे उद्धव यांनी म्हटले. याशिवाय, त्यांनी दुष्काळी भागात शिवसेनेकडून कन्यादान ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या योजनेतंर्गत शिवसेनेकडून पिडीतांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येणार असल्याची माहिती उद्धव यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2015 रोजी प्रकाशित
‘केंद्राने बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही आर्थिक मदत द्यावी’
केंद्राकडून मराठवाड्यालाही अशीच मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
Written by रोहित धामणस्कर
Updated:

First published on: 12-09-2015 at 14:59 IST
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayदुष्काळ (Drought)DroughtबिहारBiharमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Center should declare special package for maharashtra and bihar said uddhav thackeray