लोकसभा निवडणुकीतील विजय, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ व भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे जाहीर केल्यानंतर मुंडे उद्या (शनिवारी) संत भगवानबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी भगवानगडावर येत आहेत. मागील वेळी मुंडेंना गडावरून दिल्ली दिसली आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. आता राज्यातही सत्तापरिवर्तनासाठी मुंडे गडावरून रणिशग फुंकतील, असे मानले जात आहे.
मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली, तर भाजपने आगामी विधानसभा निवडणुका मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचे जाहीर करून अप्रत्यक्षपणे त्यांची महायुतीची मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर केली. सलग १५ वष्रे सत्तेबाहेर राहून संघर्ष करणाऱ्या मुंडेंना एकाच वेळी सत्तेची पदे खुणावू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रतिष्ठा पणाला लावूनही मुंडे दीड लाखाच्या फरकाने विजयी झाले. मतदानानंतर मुंडे यांनी २० एप्रिलला भगवानगडावर भगवानबाबा समाधीचे दर्शन घेतले होते. भगवानगडास मुंडेंच्या सामाजिक-राजकीय जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. वीस वर्षांपूर्वी भगवान सेनेची स्थापना करून मुंडेंनी राजकीय परिवर्तनासाठी संघर्ष उभा केला. त्यामुळे भगवानगडावरून अनेक राजकीय निर्णय व दिशा जाहीर केल्या जातात.
या वेळी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला शासकीय कार्यक्रम मुंडे यांनी गडावर घेतला. खास विमानाने मुंडे औरंगाबादला व तेथून शनिवारी सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने भगवानगडावर येतील. दर्शन घेतल्यानंतर मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज  यांच्याशी चर्चा करतील. गडाच्या वतीने मुंडे यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती गडाचे सचिव व राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोिवद घोळवे यांनी दिली. भगवानगडावरून मुंडे जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमाला जाणार आहेत.