कराड : माता व पुत्र प्रेमाचे प्रतीक तसेच भक्ती व शक्तीचा संगम असलेल्या उंब्रज (ता. कराड) येथील प्रसिद्ध भीम- कुंती उत्सवाला प्रथेप्रमाणे उत्साहात अन् दिमाखात प्रारंभ झाला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात सोमवारी गोरज मुहूर्तावर भीम- कुंती यांच्या मूर्तीची अनोखी भेट भीममंडपात झाली. या वेळी उंब्रज परिसरातील माहेरवाशीण महिलांसह पुरुष, चिमुकल्यांसह भाविकांनी गुलालाची एकच उधळण करीत या उत्सवात उत्साहात सहभाग घेतला. ‘भीम भीम राजेस राजेस महाराज की जय’ अशा जयघोषाने या वेळी अवघा परिसर दुमदुमून गेला होता. या भीम- कुंती उत्सवात वरुणराजाचीही हजेरी राहिली होती.

प्रथेप्रमाणे सरत्या श्रावणी सोमवारी भीम- कुंती उत्सवास प्रारंभ होतो. सकाळी भीमसेन मंडपात मिरवणुकीमध्ये कुंतीमातेच्या मूर्तीसह रथात बसण्याचा मान दर वर्षीप्रमाणे बोली पद्धतीने या वेळीही देण्यात आला आहे. तो १ लाख ११ हजार १११ रुपयांची सर्वाधिक बोली बोलून बापूसाहेब शंकर जाधव यांनी मिळवला आहे. दुपारी एकच्या सुमारास ज्या घरात परंपरेनुसार कुंती मातेची मूर्ती तयार केली जाते, त्या महामुनी यांच्या घरी कुंतीमातेची विधिवत पूजन होऊन कुंती मातेची मूर्ती रथामध्ये विराजमान करण्यात आली. बापूसाहेब जाधव हे स्वतः रथात मूर्तीला घेऊन विराजमान झाले आणि मिरवणुकीस सुरुवात झाली.

माता भीम अन् पुत्र कुंती यांच्या या मिरवणुकीच्या प्रारंभी बँड पथक पाठोपाठ भजनी मंडळ होते. सवाद्य मिरवणूक महामुनी यांच्या घरापासून श्री. भैरवनाथ मंदिरामार्गे उंब्रज ग्रामपंचायत चौकातून मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर आली. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळे, खण, नारळ उत्सव मूर्तीला अर्पण केले.

यानंतर ही मिरवणूक महामार्गाच्या पश्चिम बाजूला मारुती मंदिराजवळ पोहोचली. मिरवणुकीने मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा भीममंडपात येऊन ती विसावली. येथे माता कुंती व पुत्र भीम यांच्या मूर्तीची भेट घडवण्यात आली. हजारो भक्तांनी हा सोहळा ‘याची देही- याची डोळा’ अनुभवला. उशिरापर्यंत भीम मंडपात माता कुंती अन् भीम यांच्या मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.