भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक करतानाच मुख्यमंत्र्यांची कुंडली आपल्याला पहायची असल्याचं वक्तव्य केलं आहे.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर अजित पवार यांना परवा विधानसभेच्या सभागृहामध्ये चिठ्ठी लिहून हवं तर श्रेय घ्या पण संप मिटवा असं सांगितल्याचं म्हटलं. अजित पवारांची कामाची पद्धत ही रोखठोक असून होय तर होय आणि नाही तर नाही अशापद्धतीने ते काम करतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावरुनच राजू शेट्टींनी, “अजित पवार राज्य चालवतायत, मुख्यमंत्री कधीतरीच दिसतात,” अशी बारामतीमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी या मताशी सहमती दर्शवत उद्धव ठाकरेंची कुंडली पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

“वस्तूस्थिती ही आहे की आधी उद्धवजींना कोव्हीडमुळे शक्य नव्हतं, आता आजारपणामुळे शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांची कुंडली बघायची आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आलेला आहे. कशाचंच सोयरसूतक नाही. पण कोणी त्यांना आडवूच शकत नाही. सगळ्यांची ती मजबुरी आहे. आता ठीक आहे एक एकाचं भाग्य असतं. पण प्रश्न तर सुटले पाहिजेत. प्रश्न एकनाथ शिंदे सोडवू शकतात, अजित पवार सोडवू शकतात. लोक त्यांच्याकडे जातात,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लागवला आहे.

नक्की वाचा >> “किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुढे बोलताना, “शिवसेनेचा एक आमदार मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत नाही. वेळच दिला जात नाही तिथून तर ते एकनाथ शिंदेंकडे जातात. सगळे आमदार अजितदादा कुछ करो असं म्हणतात. अजितदादांना हो तर हो, नाही तर नाही म्हणता येतं ही वस्तूस्थिती आहे. परवा त्यांनी सभागृहामध्ये अप्रत्यक्षपणे सांगितलं की वाईनचा निर्णय आम्ही गुंडाळत आणायलाय. हे धाडस फक्त दादांमध्ये बाकीचे हेकट आहेत,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “महाविकास आघाडीचे महान नेते काहीही करतो. पण या सगळ्या तपास यंत्रणांची स्वायत्तता आहे. ते का करणार आहेत, काय केलं आहे हे सांगत नाहीत. त्यांनी सांगण्याचं काही कारणच नाही ना कारण आपण अथॉरिटी नाही. त्यांना डायरी सापडली का, नोंद सापडली का मला काही माहिती नाही. मला एवढचं दिसतंय की खूप काहीतरी होणार आहे,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मातोश्रीचा उल्लेख असणाऱ्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी अतुल भातखळकरांनी केलीय, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटलांनी, “ही मागणी योग्यच आहे. या चौकशीमधून आता कोणी सुटत नाही. माझी चेष्टा केली जाते राऊतांकडून. ही सगळी चेष्टा अंगावर येणार आहे. मी जे जे म्हणतोय ते खरं ठरत चाललंय. मी असं म्हटलं की काही जात्यात आहेत काही सुपात आहेत. जात्यातल्यांचं पीठ झालं तर सुपातले जात्यात जायला लागलेत, एवढच मला म्हणायचं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.