सोलापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमाराचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही उमटत असून सोलापूर व अकलूजसह माळशिरस, करमाळा आदी भागात आंदोलनाची धग दिसून आली. सोलापूर-पुणे आणि सोलापूर-बार्शी रस्त्यांवर सुमारे तासभर ‘ चक्का जाम ‘ आंदोलन करून वाहतूक रोखून धरण्यात आली होती. माळशिरस व करमाळा तालुक्यात पुकारलेल्या ‘ बंद ‘आणि मोर्च्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा >>> “ओबीसी-मराठा समन्वयाने राहू”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले? जाणून घ्या सविस्तर!

करमाळा येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यात मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही मंत्र्याला करमाळ्यात प्रवेश करू न देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच मराठा आरक्षण देण्यास सरकार असमर्थ ठरल्याने त्यावर संतप्त प्रतिक्रिया म्हणून करमाळावासियांच्यावतीने सरकारला बांगड्यांचा प्रतिकात्मक आहेर पाठविण्यात आला.सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे येथे तीन दिवसांपूर्वी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा आदी संघटनांनी ‘ चक्का जाम ‘ आंदोलन केले होते. त्यानंतर पुन्हा याच परिसरात दुस-यांदा चक्का जाम करून दोन्ही बाजूंकडील वाहतूक रोखण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. यावेळी रस्त्यावर टायर पेटवून संतप्त प्रतिक्रिया नोंदविण्यात आली.

हेही वाचा >>> “तुझं टमरेलच वाजवतो”, पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटलांचा संताप; म्हणाले, “जातीवंत तरुणांनी…”

याशिवाय सोलापूर-बार्शी रस्त्यावर गुळवंची फाट्याजवळ ‘ चक्का जाम’ करून सुमारे तासभर वाहतूक रोखण्यात आली होती. टायर पेटवून रस्त्यावर टाकण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या.

माळशिरस तालुक्यात अकलूजसह अनेक गावांमध्ये मराठा समाजासह अन्य संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’ला मोठा प्रतिसाद मिळाला. अकलूजमध्ये भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम करण्यात आला होता. ‘बंद’मध्ये सर्व व्यापारी संघटनांनी भाग घेतला होता. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. करमाळा शहर व तालुक्यात सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि बहुजन समाजा संघटनेने पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून आला. सर्व बाजारपेठांसह एसटी बस वाहतूक बंद होती. पोथरे नाका येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यात महिला आणि शालेय व महाविद्यालयीन मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. मराठा समाजासह धनगर, मुस्लिम, आंबेडकरी समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यानी मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमाराचा निषेध करीत आंदोलनात सहभाग घेतला होता. मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले तेव्हा पाच शालेय व महाविद्यालयीन मुलींनी भाषणे केली.