पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अर्थसंकल्पात ‘नमामी चंद्रभागा’ अभियानाची घोषणा केली. यासाठी २० कोटींची तरतूद केली. मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्र्यांनी पंढरपूरमध्ये येऊन गेल्या १ जूनला या अभियानाची सुरुवात केली. पण गेल्या वर्षभरात भूमिपूजनाशिवाय काहीच झाले नाही. या योजनेतील विविध विकासकामे मंजुरीसाठी मंत्रालयातच रखडली आहेत.   लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामी गंगेच्या धर्तीवर राज्य सरकारने कित्ता गिरवला. नुसती घोषणा करून थांबले नाहीत तर अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद करण्यात आली. मुनगंटीवार यांनी पंढरपूरला भेट देऊन विविध विकासकामांची घोषणा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण करणे, नदी पात्रात बारमाही पाणी राहील यासाठी उपाययोजना, चंद्रभागा नदीच्या पूर्वेला शोभेची आणि सावलीसाठी वृक्षारोपण करणे. पालिकेच्या ताब्यातील यमाई तलाव येथे तुळशी वन उभारणे. या तुळशी वनमध्ये विविध संतांचे, पालखी मार्गाचे चित्र उभे करण्याचे नियोजन झाले. याकामी पंढरपूर वन विभागाने सव्वा वर्षांपूर्वी विविध जातींची तुळशीचे रोपे आणली आहेत. वन विभागाच्या कासेगाव रोडवरील जागेत तुळशीची रोपे वन विभागाकडून जोपासली जात आहेत.

तुळशी वन उभारण्यासाठी सुरुवातीला पालिकेची मंजुरी मिळण्यात काही कालावधी गेला. त्यानंतर पुढील विविध कामांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी वेळ गेला. हीच परिस्थिती भुयारी गटार, नदीचे शुद्धीकरण आदी कामे ही प्रशासकीय मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर रखडून पडली आहेत. गेल्या वर्षी १ जूनला या अभियानाचे मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. हे अभियान मार्गी लागण्यासाठी प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली.

मात्र, यालाही एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात प्राधिकरणाची बैठकही झाली नाही.   एकंदरीत नमामी चंद्रभागा अभियानाच्या कामाची घोषणा होऊन जवळपास १४ महिने उलटले आहेत. या कामाची विविध प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी ही योजना मंत्रालयात अडकून पडली आहे.

आता महिन्यावर आषाढी यात्रा येऊन ठेपली आहे. आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. निदान त्या आधी या योजनेच्या रखडलेल्या कामांना गती दिली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सुधीरभाऊंची पाठ

या अभियानाची घोषणा केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीला रस घेतला होता. घोषणा झाल्यावर त्यांनी लगेचच चंद्रपूरला भेट दिली होती. गेल्या १ जूनला अभियानाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मात्र सुधीरभाऊंनी पंढरीची वारी केलेली नाही. मध्यंतरी त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण ते फिरकलेच नाहीत.

  • चंद्रभागा नदी शुद्धीकरण करण्याचे काम करताना नदीचे उगमस्थान म्हणजेच भीमाशंकर ते उजनी धरण आणि पुढील टप्प्यात तेथून पुढे मंगळवेढापर्यंत नदी शुद्धीकरण केले जाणार आहे.
  • प्रामुख्याने पुणे व पिंपरी परिसरातील कारखाने, सांडपाणी आदी ठिकाणचे प्रदूषित पाणी भीमा नदी पात्रात जाते. हे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी कॉंग्रेस सरकारने प्रयत्न केले होते. पण त्यात यश आले नव्हते.
  • जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह हे मध्यंतरी कामानिमित पंढरपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नदीकाठी बेसुमार वाळू उपशाने नदी मृत होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrabhaga river scam sudhir mungantiwar marathi articles
First published on: 08-06-2017 at 03:52 IST