मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी प्रत्येकी २५०-३०० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर हल्लाबोल केला. “भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत,” असा आरोप खैरेंनी केला. तसेच मागील सभेत केवळ २५ खुर्च्या होत्या, त्यामुळे नाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खूष करण्यासाठी हे केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमध्ये बोलत होते.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. ते पैठणला येत आहेत. मागील वेळी शिंदे आले तेव्हा केवळ २५ खुर्च्या होत्या. त्यामुळे बरीच बदनामी झाली असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे काय लावलं आहे असं म्हटलं असेल. म्हणून आता त्यांना खूष करण्यासाठी यावेळी तेथील बंडखोर आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी मोठ्या सभेची घोषणा केली. त्या सभेसाठी गर्दी करण्यासाठी अंबड, घनसावळी, पाथर्डी आणि संभाजीनगरच्या बाहेरील तालुक्यांमधून फोन आले.”

“मिळालेल्या ५० खोक्यांमधील पैसे कमी करण्यासाठी आतापासूनच वाटप”

“अंगणवाडीच्या महिला आणि इतर महिलांना सभेसाठी २५० रुपये, ३०० रुपये देऊन गाडीत बसवण्यात आले. याबाबत एक ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरत आहे. त्यात पैसे देऊन लोकं आणायला लागले हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय. मला अनेक लोकांचे फोन आले आणि जे दाखवत आहेत ते काय आहे अशी विचारणा झाली. मी त्यांना सांगितलं की जे ५० खोके मिळाले ते पैसे कमी करण्यासाठी आतापासूनच वाटप सुरू झाली आहे,” असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला.

हेही वाचा : “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवणार”, चंद्रकांत खैरेंच्या गुलाबराव पाटलांवरील टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कितीही खोके रिकामे केले तरी आदित्य ठाकरेंच्या सभेशी बरोबरी होणार नाही”

“संदीपान भुमरे यांनी कितीही खोके रिकामे करून लोकं जमा करण्याचा प्रयत्न केला, तरी आदित्य ठाकरे यांच्या सभेशी बरोबरी होऊ शकत नाही. आज भुमरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलत आहेत. त्यांनी काहीच केलं नाही आरोप करतात. माझ्या तोंडात शिव्या येत आहेत, पण मी देणार नाही. काय होते भुमरे आणि काय बोलतात. उद्धव ठाकरेंनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. तुम्ही हातापाया पडले आणि त्यांनी देऊन टाकलं,” असंही खैरेंनी म्हटलं.