शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये देण्यात आले,” असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच हा खर्च टरबुजाने केला की कुणी केला? असा सवाल उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर शिवसैनिकांनी टरबुजाने केला असं उत्तर दिलं. यावर खैरेंनी टरबुजाने खर्च केला असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक तुम्हाला याबाबत सांगतील, असं म्हटलं.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “आनंद दिघे यांनी गद्दारांना क्षमा नाही म्हटलं. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. हे आनंद दिघेंचे शिवसैनिक नाहीत, हे नकली शिवसैनिक आहेत. आनंद दिघेंनी त्यांना रिक्षा चालवताना नगरसेवक केलं, पण ते आनंद दिघेंना विसरले. हा रिक्षावाला माणूस इतका मोठा कसा होतो? एवढे पैसे कोठून आले? कोट्यावधी रुपये छापलेत. सुरत, गोवाहाटीला विमानाने गेले. पैसे कोठून आले? हे पैसे टरबुजने दिले.”

“संघ परिवार आमच्याकडून देणगी घेतं आणि हे पैसे तिकडे वापरता का?”

“बंडखोर आमदारांना ७,००० कोटी रुपये दिले. तुमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मित्र असतील तर त्यांना विचारा. ते तुम्हाला सांगतील की यासाठी ७,००० कोटी रुपये खर्च केले आहेत. संघ परिवार देखील काही असेल तर आमच्याकडून देणगी घेतं आणि हे पैसे तुम्ही तिकडे वापरता का?” असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला.

“उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदासाठी त्या दाढीचा चेहरा होता”

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, “आपण मजबुतीने उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहू. त्यांनी सांगितलं होतं की मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. मात्र, शरद पवार यांनी दुसरं कुणी चालणार नाही असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यावेळी त्या दाढीचा चेहरा होता. मात्र, शरद पवारांनी सांगितलं की हे कालचं पोरगं कुठं मुख्यमंत्री करायचं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ते मुख्यमंत्री झाले तरच सरकार चालेल असं सांगितलं. अडीच वर्षे सरकार व्यवस्थित चाललं.”

हेही वाचा : Photos : हेच ते ४० बंडखोर आमदार, कुणाची संपत्ती किती, कोणते गुन्हे दाखल? वाचा सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दाढीने आमदारांना निधी दिला असेल तर तो काही त्यांनी त्यांच्या खिशातून दिला नाही. तो निधी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच दिला. सोंगढोंग करणाऱ्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी संपूर्ण मराठवाडा एकत्रितपणे तयार आहे. मराठवाडा कायम शिवसेना प्रमुखांच्या पाठिशी आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे,” असंही खैरेंनी नमूद केलं.