महाविकास आघाडीतील शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. दरम्यान, फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. पण राष्ट्रवादी पक्ष नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचं शरद पवारांसह अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चात भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
“राज्यात गेल्या २७ महिन्यांत संजय राठोड यांचा राजीनामा पक्षाने दबावात आल्यानंतर घेतला. तर, अनिल देशमुखांच्या बाबतीत हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर राजीनामा घेतला. आता नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजीनामा घ्यायचा निर्णय झाला, परंतु थोड्या वेळात हा निर्णय बदलला. हा निर्णय कोणाच्या दबावामुळे बदलला?, तर हा निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलला,” असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तसेच दाऊदच्या दबावाला घाबरून निर्णय बदलणाऱ्या या सरकारला घालवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत, असंही पाटील म्हणाले.
“मलिकांच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनं झाली, त्यांचा पुतळा जाळण्यात आला. आता देखील अधिवेशन सुरू असल्यामुळे फक्त मुंबईत मोर्चा काढण्यात आला. आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. ‘ये तो बस एक अंगडाई है, आगे और लडाई है. राज्यभर आम्ही लढा उभारू आणि तुमचं जगणं मुश्किल करून टाकू,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. “तुमचं नाव दाऊदशी जोडलं गेलंय, तुम्ही दाऊदला संरक्षण देण्यासाठी, दाऊदची मदत करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला शेतकऱ्यांची चिंता नाही, पेपर रद्द होतात, पिकं जळतात, मात्र या सरकारला या कशाचीच चिंता नसून ते फक्त नवाब मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.